‘मोनो’च्या सदोष यंत्रणेमुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड, कार्डाची नोंद न झाल्याने विद्यार्थ्याला अडवून धरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-monorail-001

मोनो रेलच्या सदोष संगणक प्रणालीमुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड बसत आहे. एका विद्यार्थ्याकडे असलेल्या मोनोच्या प्रवास कार्डाची तेथील संगणक यंत्रणेत नोंद न झाल्याने त्याला प्लॅटफॉर्मवर बराच वेळ अडवून ठेवले गेले आणि काही गुन्हा नसतानाही त्याला दंड आकारला गेला.

लोअर परळ येथे राहणारा अर्पित मेजारी हा वडाळा येथील सेंट जोसेफ शाळेत आठवी इयत्तेत शिकतो. तो लोअर परळ-वडाळा-लोअर परळ असा रोज मोनोने प्रवास करतो. त्याच्याकडे प्रवासकार्डही आहे. काही दिवसांपूर्वी वडाळा मोनो रेल स्थानकातून तो घरी येत होता. प्लॅटफॉर्मवर गाडी येत असल्याचे समजल्याने त्याने घाईने आपले दप्तर मशीनवर स्कॅन केले आणि पुढे दरवाजा उघडण्यासाठी त्याने आपले कार्ड तिथे लावले. परंतु त्याच्या आधी प्रवेश केलेल्या प्रवाशाने उघडलेला दरवाजा तोपर्यंत बंद झाला नव्हता. त्यामुळे अर्पितच्या कार्डाची वडाळा स्थानकाच्या संगणक प्रणालीत नोंद होऊ शकली नाही. घाईनेच अर्पितने त्यातून प्रवेश करत गाडी पकडली.  लोअर परळ स्थानकात उतरल्यानंतर बाहेर पडण्यासाठी अर्पितने दरवाजावर कार्ड लावले तेव्हा मात्र दरवाजा उघडला नाही. कारण त्याच्या कार्डाची वडाळा येथे नोंद झाली नव्हती. वडिलांनी 30 रुपये दंड भरल्यानंतरच अर्पितला जाऊ देण्यात आले.  

मोनोच्या सेवा प्रवाशांसाठी सुलभ असाव्यात

प्रवास कार्ड किंवा टोकनचा वापर कसा करावा याची माहिती मोनो रेलच्या स्थानकात आहे, परंतु धावपळीत प्रवाशांच्या ती नजरेत येत नाही. मोनोच्या सेवा या प्रवाशांना सुलभ अशा असाव्यात अशी प्रतिक्रिया मोनोचे दैनंदिन प्रवासी महेंद्र शिरावळे यांनी दिली तर काहीही गुन्हा नसताना दंड आकरण्याऐवजी तिकिटाचे पैसे त्या विद्यार्थ्याच्या प्रवासकार्डातून वळते करून घ्यायला हवे होते असे दुसरे प्रवासी सुधीर मणचेकर यांनी सांगितले.

एखाद्या स्मार्टकार्डधारक प्रवाशाची नोंद संगणक प्रणालीमध्ये झाली नाही तर तो विनातिकीट असल्याचे गृहीत धरून त्याच्याकडून दंड वसूल करावा लागतो. – जोएल अब्राहम, स्टेशन मास्तर