
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये भयंकर घटना समोर आली आहे. येथे एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्या शाळेतील २६ वर्षीय शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार (18 आॅगस्ट) दुपारी ३:३० च्या सुमारास ही घटना घडली. सूर्यांश कोचर असे या आरोपी विद्यार्थ्याचे नाव आहे. आरोपी आणि शिक्षिका दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. सूर्यांशचे शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम निर्माण झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान शाळेतील १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी शिक्षिकेने साडी नेसली होती. यावेळी आरोपी विद्यार्थ्याने चूकीची टिप्पणी केली. त्यामुळे शिक्षिकेने त्या विद्यार्थ्याची तक्रार केली.
आपल्या आवडत्या शिक्षिकेनेच आपल्या विरोधात तक्रार केल्यामुळे त्याला प्रचंड राग आला होता. हाच राग डोक्यात ठेवून आरोपी विद्यार्थ्याने शिक्षिकेचा काटा काढायचे ठरवले. यासाठी सोमवारी दुपारी आरोपी पेट्रोलने भरलेली बाटली घेऊन शिक्षिकेच्या घरी गेला. आणि कोणताच विचार न करता त्याने तिच्यावर पेट्रोल ओतले आणि तिला पेटवून दिले. नंतर घटनास्थळावरून पळून गेला.
घटनेची माहिती शेजाऱ्यांना कळेपर्यंतच शिक्षिका १०-१५ टक्के भाजली होती. त्यामुळे तिला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला आहे. तसेच कलम १२४अ आणि इतर संबंधित आयपीसी कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचा जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.