पेपर सुरू असताना विद्यार्थ्याना उलटी व चक्कर, 12 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । केज

मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून मंगळवारी घेण्यात आलेल्या जिज्ञासा कसोटी परीक्षेदरम्यान पेपर सुरू असतानाच वाढत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होऊन उलटी व चक्कर येण्याचा प्रकार घडला. मात्र वेळीच डॉक्टर आल्याने पुढील अनर्थ टळला.

मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून बीड जिल्ह्यात इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिज्ञासा कसोटी घेण्यात आली. गुणवत्ता वाढीसाठी असलेला हा महत्वकांशी उपक्रम सकाळी 9.30 ते 11.30 व दुपारी 1.30 ते 3.30 या वेळेत राबवण्यात आला. पहिला पेपर मुलांनी व्यवस्थित दिला. मात्र दुपारच्या पेपर दरम्यान उलटी, चक्कर व ताप चढल्याचा प्रकार घडला. सुमारे 12 विद्यार्थ्य़ांना हा त्रास झाला. परंतु केंद्र संचालक शिवाजी काळे यांनी तात्काळ विडा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करून माहिती दिली असता वैद्यकीय अधिकारी श्रीमती कांबळे यांनी केंद्रावर येऊन मुलांवर उपचार केले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, केंद्रावर एकूण 316 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 267 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मात्र उन्हाच्या वाढत्या तापमानातच परीक्षा घेण्यात आल्यामुळे मुलांना अशा प्रकारे ञासाला सामोरे जावे लागले असल्याने पालक वर्गात तीव्र नाराजी दिसून आली.