मानवी साखळीतून साकारली रायगड जिल्ह्याची प्रतिकृती व निवडणूक आयोगाने चिन्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

मतदान जनजागृती (Sveep) कार्यक्रमांतर्गत रायगड लोकसभा व महाड विधानसभा मतदार संघामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड येथील प्रांगणात विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून जिल्ह्याची भव्य प्रतिकृती व निवडणूक आयोगाचे चिन्ह तयार करण्यात आले होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्याच्या दृष्टीने, जनजागृती करण्याच्या उद्देशाने आजच्या या मानवी साखळीचे अयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील सुमारे 1500 विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून रायगड जिल्हाची प्रतिकृती साकारली होती. सदर प्रतिकृतीमध्ये निवडणुक आयोगाचे चिन्ह व मतदान केलेल्या मतदाराचे बोट प्रतिकात्मक रित्या साकारण्यात आले होते. संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी सदर कलाकृती सादर केली. विठ्ठल इनामदार, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी 32, रायगड लोकसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी महाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना मतदान करण्याबाबतची शपथ दिली. यावेळी मतदार जनजागृती विषयक घोषणांनी परिसर दणाणून गेला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयचे प्राचार्य धनाजी गुरव व प्राध्यापक सोनार तसेच, इतर सर्व स्टाफ यांनी विशेष सहाय्य केले. नितीन गुरव, न्यु इंग्लिश स्कूल, वाळण यांनी सदर आकृती तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

संपूर्ण कार्यक्रमाचे ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी 194 महाड विधान सभा मतदार संघातील महाड तहसिलदार चंद्रसेन पवार, माणगाव तहसिलदार प्रियांका आयरे व पोलादपूर तहसिलदार प्राजक्ता घोरपडे तसेच सर्व नायब तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठी, व सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.