पंतप्रधानांवरील बीबीसी डॉक्युमेंटरीचा वाद सुरुच; दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांना घेतले ताब्यात

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वादग्रस्त बीबीसी डॉक्युमेंटरी दाखवण्याचा वाद अद्यापही सुरुच आहे. याचे प्रसारण रोखण्यासाठी कॅम्पसमध्ये वीज खंडित करण्यात आली होती. त्यानंतर आता राजधानीतील दिल्ली विद्यापीठ आणि आंबेडकर विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेबाहेर जमावास बंदी घालण्यात आली आहे.तसेच स्क्रीनिंग थांबवण्यासाठी आंबेडकर विद्यापीठातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या एका गटाने दोन्ही विद्यापीठांमध्ये घोषणाबाजी केली आणि याचा निषेध केला. त्यापैकी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली विद्यापीठात डॉक्युमेंटरी दाखवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल यापूर्वी 24 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले होते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

अनेक विद्यार्थी दिल्ली विद्यापीठाच्या कला विद्याशाखेत जमले होते. त्यांनी स्क्रीनिंग थांबवण्यासाठी परिसरात कलम 144 लादल्याच्या निषेध व्यक्त केला. सायंकाळपर्यंत पोलीस आणि विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांमध्ये वादावादी सुरू होती. ‘दिल्ली पोलिस परत जा’ अशी घोषणाबाजी विद्यार्थ्यांनी केली. पोलिसांनी अनेक आंदोलकांना मारहाण केल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.

विद्यापीठात डॉक्युमेंटरी दाखविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल यापूर्वी 24 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले होते, अशी माहितीएका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. दिल्ली विद्यापीठाच्या प्रशासनातील सूत्रांनी सांगितले होते की कॅम्पसमध्ये सामूहिक स्क्रीनिंग किंवा सार्वजनिक स्क्रीनिंगला परवानगी देण्यात येणार नाही. तथापि, विद्यार्थ्यांना ते त्यांच्या फोनवर पहायचे असल्यास, तो त्यांचा निर्णय असेल. पोलिस सूत्रांनी सांगितले की विद्यापीठांनी अशा स्क्रीनिंगसाठी परवानगी दिलेली नाही आणि दिल्ली पोलिसांशी देखील संपर्क साधण्यात आला आहे. स्क्रिनिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मन वळवण्यासाठी चर्चा करण्यात आली होती. मात्र, काही विद्यर्थी निर्णयावर ठाम होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच स्क्रीनिंगसाठी विद्यार्थी जमल्यास कारवाई करण्यात येणार आहे. दिल्ली विद्यापीठाच्या प्रॉक्टर रजनी अब्बी म्हणाल्या की त्यांनी याप्रकरणी दिल्ली पोलिसांना पत्र लिहिले आहे आणि ते योग्य ती कारवाई करतील. आम्ही बीबीसी डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगला परवानगी दिलेली नाही. तसेच प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जामिया मिलिया इस्लामियामध्ये बुधवारी, कॅम्पसमध्ये स्क्रीनिंग आयोजित करण्यावरून गोंधळ घातल्याप्रकरणी विद्यापीठातील 13 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंतप्रधानांवरील बीबीसीच्या डॉक्युमेंटरीमुळे वाद सुरू आहे. त्यावर केंद्राने IT नियम, 2021 च्या कलम 16 अंतर्गत आणीबाणी आदेश वापरून बंदी घातली आहे. मात्र, देशभरातील काही विद्यार्थी संघटनांकडून याच्या स्क्रीनिंगसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रकरणी आता दिल्लीतील दोन विद्यापीातील काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.