कार्यक्रमाला या, नाहीतर परीक्षेला बसू देणार नाही; मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी विद्यार्थ्यांना धमकी

शासकीय वैद्यकिय महाविद्यालयच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत येत असून कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांवर कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची सक्ती केली जात आहे. जे विद्यार्थी आज कार्यक्रमाला येणार नाहीत त्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट दिले जाणार नाही. परीक्षेला बसू दिले जाणार नाही असा फतवाच शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरीच्या प्राचार्यांनी काढला आहे. विद्यार्थ्यांवर एक प्रकारे हा अन्याय असून शासकीय वैद्यकिय महाविद्यालयच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गर्दी जमविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.

शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे आज गुरूवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला गर्दी कशी जमवायची हा आयोजकांसमोर प्रश्न पडला. आयोजकांनी गर्दीसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरायला सुरूवात केली. शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांवर कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची सक्ती करण्यात आली आहे.

शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरीच्या प्राचार्यानी एक फतवा काढला आहे. त्यामध्ये दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता आपल्या वर्ग खोल्यात सिव्हिल ड्रेसवर विद्यार्थ्यांनी उपस्थित रहायचे आहे. जे विद्यार्थी उपस्थित रहाणार नाहीत त्यांना परीक्षेचे हॉलतिकिट मिळणार नाही. त्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नसल्याचे धमकावले गेले आहे.

गर्दीसाठी आटापिटा

शासकीय वैद्यकिय महाविद्यालयच्या उद्घाटन कार्यक्रमाला कुणी येणार नाही हे माहित असल्यानेच गर्दीसाठी हा आटापिटा केला जात आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.