पाठय़पुस्तकांत वह्यांची पाने जोडण्याच्या निर्णयात बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शालेय पाठय़पुस्तकात वह्यांची पाने जोडण्याच्या निर्णयात शालेय शिक्षण विभागाने अवघ्या आठवडाभरातच बदल केला आहे. सुरुवातीला या निर्णयाची अंमलबजावणी तिसरी ते दहावीच्या पाठय़पुस्तकात होणार होती, मात्र शिक्षण विभागाने बुधवारी यासंदर्भात पुन्हा एकदा शासन निर्णय जाहीर केला असून आता दुसरी ते आठवीच्या पाठय़पुस्तकात वह्यांची पाने जोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

वर्गात शिकवण्यात येणाऱया प्रत्येक धडा, कविता, गणिते यांच्या नोंदी, महत्त्वाचे सूत्र, संबोधन, वाक्ये, टिपण याच्या नोंदी पाठय़पुस्तकातच करता यावी यासाठी पुस्तकात माझी नोंद या सदराखाली वह्यांची पाने जोडण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. या निर्णयानंतर शिक्षण क्षेत्रात अनेक चर्चा झाल्या. यामुळे पुस्तकांचा आकारमान वाढून दप्तराचे ओझे वाढेल. याशिवाय पुस्तकांच्या किमतीदेखील वाढतील, अशा गोष्टी समोर आल्या होत्या. यापूर्वी शिक्षण विभागाने 2 मार्च रोजीदेखील याविषयीचा शासन निर्णय जाहीर केला होता.