
पोलीस अधीक्षक कार्यालय (ग्रामीण) संभाजीनगर कार्यालयामार्फत नव्याने तयार करण्यात आलेल्या बॉक्सींग विंग व फायरिंग रेंजचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या (ग्रामीण) आवारात उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अंबादास दानवे, विशेष पोलीस महानिरिक्षक मल्लीकार्जून प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड, बॉक्सींग आणि फायरिंग रेंज असोशिएशनचे पदाधिकारी तसेच पोलीस अधिकारी, अमंलदार उपस्थित होते. यावेळी गडचिरोली येथे खडतर सेवा प्रदान केलेले पोलीस अधिकारी प्रदिप आवटे यांचा देसाई यांच्या हस्ते पदक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सुभाष देसाई म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या कामात कौशल्य प्राप्त करुन ते जतन केले पाहिजे. त्यामुळे आपल्या कामास गती मिळते. पोलीस विभागाला अधिक गतीमान करण्याचे शासनाचे ध्येय असून विभागासाठी वाहन, हत्यारे आदीमध्ये सुसज्ज असण्याबरोबर विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी निधीची वेळोवेळी उपलब्धता करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या या बॉक्सींग विंग व फायरिंग रेंजच्या माध्यमातून पोलिसांना आपल्या कौशल्यात अद्ययावत राहण्यास मोठी मदत होणार आहे. या सुविधेचा पोलीस दलासोबत नागरिकांनाही वापर करण्याची संधी मिळाल्यास या क्षेत्रात उत्तम खेळाडू तयार होतील, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची सुचनाही देसाई यांनी संबंधितांना केली.





























































