सरकारी फायलींवर मराठीत शेरा नसेल तर परत पाठवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासकीय व्यवहारात मराठी वापर वाढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. शासकीय फाईलींवर मराठी भाषेत शेरा लिहिण्याची सक्ती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मराठी भाषेत शेरा लिहिला नसेल तर फाईल परत पाठवली जाईल असे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी आज पत्रकारांशी मंत्रालयातील पत्रकार कक्षात अनौपचारिक गप्पा मारताना सांगितले.

प्रशासन अधिकारी तसेच विभागाच्या सचिवांनी फाईलवर इंग्रजीत शेरा लिहिला असेल तर फाईल परत पाठविण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचे देसाई म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. तसेच रंगभवन येथे मराठी भाषाभवन उभारण्याच्या आधीच्या सरकारच्या निर्णयाची माहिती घेऊन योग्य कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.