
आशिया कपमध्ये आज हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला देशभरातून विरोध होत असताना बीसीसीआय व केंद्र सरकार हा सामना खेळवण्यावर अडून बसले आहेत. त्यावरून भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. या सामन्यावरून बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये जरा तरी भाव भावना आहेत का? असा संतप्त सवाल केला आहे.
”देशातील 26 विवाहित महिलांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतींची पाकिस्तानी दहशतवाद्यांनी क्रूरपणे हत्या केली!! पण त्याहूनही भयानक म्हणजे या सर्वाच्या पुढे जाऊन आपण पाकिस्तानच्या कसायांसोबत क्रिकेट खेळणे! मोदी भारत आणि पाकिस्तानला क्रिकेट खेळण्याची परवानगी देतात, त्यांच्यात थोडीशीही भावभावनना आहे का?”, असा सवाल स्वामी यांनी केला आहे.
संबंध सुधारेपर्यंत पाकशी क्रिकेट-व्यापार नको! – हरभजन सिंग
माजी फिरकीवीर हरभजन सिंगने येत्या 14 सप्टेंबरला दुबईत होणाऱ्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यापूर्वी थेट भूमिका घेतली आहे. भज्जीने स्पष्ट शब्दांत सांगितले, दोन्ही देशांतील संबंध सुधारले नाहीत तोवर क्रिकेट आणि व्यापारही नको. पण हे त्याचे वैयक्तिक मत असल्याचे त्याने स्पष्ट केले.