हिंदुस्थानी जवानांचा ‘सुदर्शन शक्ती’ युद्धसराव; पाकड्यांना धडकी

876

जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून युद्धासह अण्वस्त्र हल्ल्याची दर्पोक्ती करण्यात आली. मात्र, हिंदुस्थानच्या लष्करी सामर्थ्यासमोर आपला निभाव लागणार नाही, याची जाणीव पाकिस्तानला आहे. राजस्थानच्या जैसलमेर वाळवंटात हिंदुस्थानी जवानांनी ‘सुदर्शन शक्ती’ नावाचा युद्धसराव सुरू केल्याने पाकिस्तानला धडकी भरली आहे. या युद्धसरावातून आपल्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन हिंदुस्थानी जवान घडवणार आहेत.

युद्धाच्या काळात शत्रूच्या कारवायांना तत्परतेने प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने जैसलमेरच्या वाळवंटात गुरुवारपासून युद्धसराव सुरू करण्यात आला आहे. हा युद्धसराव 4 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे या युद्धसरावात हवाई दलही सहभागी होणार आहे. या युद्धसरावात लष्कराचे 40 हजार जवान, 450 युद्ध टँक सहभागी झाले आहेत. कॉम्बोट स्किल्स, डीप स्ट्राईक क्षमता आणि युद्धाच्या काळातील प्रत्युत्तराच्या कारवाईचा सराव करण्यात येत आहे. या युद्धसरावात पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीची  के-9 वज्र ही गन आपली मारक क्षमता सिद्ध करणार आहे. नुकतीच ही गन लष्कराच्या ताफ्यात दाखल करण्यात आली असून सर्वात लांब अंतरावरील लक्ष्यभेद करणारी गन आहे.

या युद्धसरावाचे निरीक्षण करण्यासाठी आणि आढावा घेण्यासाठी 21 कॉपचे जी.ओ.सी. लेफ्टिनंट योगेंद्र डिमरी जैसलमेरला पोहचले आहेत. या युद्धसरावाच्या समारोपावेळी 4 डिसेंबरला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख, हवाई दलप्रमुख यांच्यासह तिन्ही दलातील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या युद्धसरावाचा पहिला टप्पा पार पडला असून युद्धसरावाचा हा दुसरा टप्पा आहे. या युद्धसरावात अद्ययावत लाइट हेलिकॉप्टर रुद्रही सामर्थ्याचे दर्शन घडवणार आहे. या युद्धसरावात लष्कराचे जवान फायरिंग रेंजचा सराव करत असून तोफा आणि रणगाड्यांच्या मदतीने लक्ष्यभेद करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात येत आहे. जमीनीवर आणि हवाई क्षेत्रात अचूक लक्ष्यभेद करण्याचा सरावही जवान करत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या