मुनगंटीवारांच्या शिष्टाईला अपयश, ओबीसी आंदोलन कायम

चंद्रपुरात मागील आठ दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी कार्यकर्ते रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन  संपवण्यासाठी राज्याचे वरिष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार आज मंडपात दाखल झाले. त्यांनी अन्नत्याग आंदोलक टोंगे व संघटना कार्यकर्त्यांशी चर्चा केली. वसतिगृह उभारणे आणि स्वाधार योजना लागू करणे या संदर्भात मंडपातून संबंधित मंत्र्यांना दूरध्वनीद्वारे मागण्यांची जाणीव करून देत लेखी आश्वासन देऊन उपोषण संपवण्याचे आवाहन केले. मात्र उपोषणकर्त्यांनी हे अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. मराठा -कुणबी प्रमाणपत्रांच्या संदर्भात मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्याशी सरकारने काय समझोता केला, ते कोणालाही कळलेले नाही, याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी देखील चर्चा करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.