साखर कारखाना संघाची नगरला गुरुवारी बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील साखर कारखान्यांचा 2019-20 चा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर निर्यात, ऑनलाईन इन्फॉर्मेशन प्रणाली, राज्य व केंद्र शासन स्तरावरील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्यावतीने राज्यभर विभागनिहाय बैठका सुरू असून अहमदनगर विभागाची बैठक गुरुवारी दुपारी 2 वाजता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे होणार आहे.

यंदाचा गळीत हंगाम सुरू करताना राज्यातील साखर कारखानदारीसमोर ऊस उपलब्धता, ऊस तोड, साखर कामगारांचे प्रश्न, साखर निर्यात धोरण, थकीत एफआरपी, साखरेचे बाजार भाव असे एक ना अनेक प्रश्न आहेत. सुरवातीला पुरेसा पाऊस झाला नसल्याने कमी ऊस लागवड झाली आहे. त्या ऊसाची वाढ अत्यंत कमी झालेली आहे. त्यामुळे उसाचे टनेज आणि साखर उतार्‍यातही घट येणार आहे. त्यातच ऑक्टोबरपासून राज्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी सुरू झाल्याने सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत साखर कारखान्याचे गळीत हंगाम 15 नोव्हेंबर पासून की 1 डिसेंबरपासून सुरू करावेत या संभ्रमावस्थेत सर्वजण आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर राज्यातील साखर कारखान्यांचा 2019-20 चा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी इएटी मॉड्युल इन पीएफएमएस प्रणाली, साखर निर्यात, ऑनलाईन शुगर इन्फॉर्मेशन प्रणाली, राज्य व केंद्र शासनस्तरावरील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने राज्यभर विभागनिहाय बैठका सुरू आहेत. राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, कार्यकारी संचालक, शेतकी अधिकारी, ऊस विकास अधिकारी, फायनान्स मॅनेजर, चीफ अकाऊंटंट आदींसोबत बैठका घेण्यात येत आहेत.

कोल्हापूर-सांगली जिल्ह्याची बैठक 1 नोव्हेंबरला दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, दत्तशीरोळ येथे झाली. सातारा-पुणे जिल्ह्याची बैठक  4 नोव्हेंबरला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, बारामती येथे झाली. सोलापूर-उस्मानाबाद जिल्ह्याची बैठक मंगळवारी  5 नोव्हेंबरला अकलूज, जि. सोलापूर येथे होत आहे. बीड, हिंगोली, नांदेड-लातूर जिल्ह्यांची बैठक बुधवारी 6 नोव्हेंबरला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, देगाव येथे होत आहे. अहमदनगर, नाशिक, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद व जालना जिल्ह्यांची बैठक गुरुवारी  7 नोव्हेंबरला  दुपारी 2 वाजता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे होणार आहे.