
ऊसतोडणीसाठी गेलेल्या कामगारांच्या दोन झोपडय़ा जळून खाक झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे घडली आहे. यात संसारोपयोगी साहित्यासह एक दुचाकी जळून खाक झाली आहे.
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊसतोडणी सुरू आहे. प्रेमचंद विक्रम चव्हाण (रा. उबरखेड, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) या मुकादमाच्या माध्यमातून 12 ऊसतोडणी कामगार आहेत. हे सर्वजण सकाळी गावालगत असणाऱया अनिल रामदास भिसे यांच्या शेतात ऊसतोडणीसाठी गेले होते. दुपारी कोणीही नसताना एका झोपडीने पेट घेतला. काही वेळातच दुसऱया झोपडीला आग लागली.
दरम्यान, ऊसतोडणी कामगारांचा ट्रॅक्टर चालक सोमनाथ चव्हाण ऊस खाली करून आला असता, त्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यात तो जखमी झाला; पण झोपडय़ांची आग विझविण्यासह अन्य झोपडय़ांपर्यंत आग पोहोचू न देण्यात तो यशस्वी ठरला. भाऊसाहेब जाधव व कपिल मोरे या दोन कामगारांच्या झोपडय़ा जळून संसारोपयोगी वस्तू खाक झाल्या आहेत, तर एक दुचाकी अर्धवट अवस्थेत जळाली आहे. दरम्यान, महसूल विभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.


























































