अवती भवती – समतोल

>> सुहास मळेकर

तुम्हाला असे वाटतेय की पूर्वीचा तोच प्रामाणिकपणा, तीच सच्चाई, नैतिकता, नम्रता तुम्हाला आजही अनुभवायला मिळते आहे किंवा समोरच्याने एका गालावर मारल्यास दुसरा गाल पुढे केल्यावर तो समोरचा शरमिंदा होतोय वगैरे? दुर्दैवाने असे दिवस मागे पडत चालले आहेत. अपवादाने असतीलही, पण टक्का घसरत चाललाय हे मात्र नक्की.

खूप वर्षांपूर्वी मराठीत एक चित्रपट आला होता ‘पळवापळवी.’ एकाने दुसऱयाचे पळविले की, दुसऱयाने तिसऱयाचे, तिसऱयाने चौथ्याचे पळवायचे असे काहीतरी पाहिले होते त्यात. हे विनोदी अंगाने दाखविलेले असले तरी वास्तवात प्रत्येकाने एकमेकांना ओरबाडण्याचे नेमके प्रतिबिंब उमटले होते.

‘बळी तो कान पिळी’चा प्रत्यय आज प्रकर्षाने येतोय. त्यामुळे परिस्थितीने दोन वर्गांमधली दरी वाढत चालली आहे. त्याचा परिणाम म्हणून आपण एकमेकांचा विश्वास गमावत चाललोय. पैसे हाच केंद्रबिंदू समजला तर तो मिळविण्यासाठी प्रत्येकाने एकमेकांना ओरबाडण्याची जणू स्पर्धाच लागलेली असताना मध्येच काहीतरी कुठेतरी आर्थिक, मानसिक अथवा शारीरिक मदतीच्या रूपाने मायेचा ओलावा दिसून आला किंवा प्रामाणिकतेचा, सच्चाईचा एखादा प्रसंग घडला की त्याचे अप्रूप वाटते.
एकदा असेच घडले. मिरची वीस रुपये पाकीट, कोथिंबीर वीस रुपये पाकीट, आलं वीस…कडीपत्ता वीस…भाजीमार्केटमध्ये सगळीकडे अशी चढाओढ चालू असताना एका भाजीवालीकडे भाज्या घेऊन कोथिंबीर मागितल्यावर चक्क ‘‘मसाला किती, दहाचा देऊ?’’ तिने विचारले.

‘‘कोथिंबीर मसाला?’’
गेले काही महिने-वर्ष या शब्दांचाच विसर पडला होता, मसाला तो ही दहा रुपयांचा? खूप वर्षांपूर्वी हे सगळे एकत्र आणि भाज्या घेतल्यावर बहुतेक वरकड म्हणजे फुकटातही मिळत असे. आता सगळे वेगवेगळे सुटे घ्यावे लागतेय.
‘‘अहो, काहीतरी गडबड झालीय. तुम्ही दहाचा मसाला देताय?’’
‘‘बरोबर, दहाचाच दिलाय.’’
‘‘तुम्हाला परवडते कसे?’’
‘‘न परवडायला काय झाले?’’
‘‘पण मग बाकीचे भाजीवाले लुटताहेत.’’
‘‘त्यांना लुटू द्या की, मला परवडतेय द्यायला…हातावर पोट असलेल्या गरीबाने कुठे जायचे?’’
‘‘बरं, आलं द्या वेगळं.’’
‘‘आलं पण टाकलंय की त्यात.’’
‘‘हातावर पोट असलेल्या गरीबाने कुठे जायचे?’’ हे नेमके वाक्य कानावर पुनः पुन्हा आदळत राहिले. हातावर पोट असलेल्या गरीबानं त्या भाजीवालीपर्यंत पोहोचावं वाटत राहिलं. इथून तिथून पैशांवर डोळा असलेल्यांपेक्षा तिच्याकडून घेतलेलं अंगाला तरी लागेल.
गरिबीची जाणीव गरीबालाच असते. ती पण गरीबच होती, सचोटीची होती. उद्योगपतींपासून व्यापारी, दलाल, दुकानदार ते फेरीवाला आणि अगदी प्रायव्हेट प्रवासी भाडे ते तीनचाकी प्रवासापर्यंत ओरबाडण्याची स्पर्धाच लागली असताना आणि सगळे हाताबाहेर चाललेय असे वाटत असताना मध्येच असा एखादा प्रामाणिक भेटला की हायसे वाटते.
अशी शुद्ध प्रजाती दुर्मीळ असली तरी सर्वच क्षेत्रांत ती आहे एवढे मात्र नक्की. ती सगळीकडे आहे, प्रत्येकाने अशा गोष्टींचा वेगवेगळय़ा ठिकाणी सुखद अनुभव घेतलेला असेल. अशा एका गोष्टीनेसुद्धा समोरची दहा माणसे सरळमार्गी होतात.
कदाचित त्यामुळेच एकूण जगरहाटीचा समतोल टिकून आहे.