आजाराला कंटाळून इसमाची आक्षी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या

5

सामना प्रतिनिधी । अलिबाग

अलिबाग तालुक्यातील अलिबाग रेवदंडा रस्त्यावरील आक्षी गावाजवळील पुलावरून मंगेश झाडेकर (55), रा. रामनाथ यांनी खाडीत उडी मारून आत्महत्या केली. आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची कारण समजत असून त्याचा मृतदेह शोधण्याचे काम पोलीस व स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.

मंगेश झाडेकर हे अलिबागमधील रामनाथ येथील रहिवासी आहेत. दारू व सिगारेटच्या व्यसनापाई त्यांना आजारपणाने ग्रासले होते. आठ दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. 22 जुलै रोजी त्यांना उपचारानंतर सोडण्यात आले होते. त्यानंतर ते घरी आले होते.

आज दुपारी नागाव येथे मित्राकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अलिबाग रेवदंडा रस्त्यावर असलेल्या आक्षी पुलावर येऊन त्यांनी खाडीत उडी मारून आपले जीवन संपविले. पुलशेजारी त्याची काठी, चपला व पैशाचे पाकीट असा ऐवज सापडला आहे.

मंगेश झाडेकर यांनी पुलावरून उडी मारल्याची घटना कळल्यानंतर अलिबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक व झाडेकर यांच्या मदतीने मंगेश झाडेकर यांचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र खाडीला भरती असल्याने मृतदेह शोधण्यात अडचण येत आहे.