भाजपसह मोदींवर टीका केल्याचा व्हिडीओ व्हायरल; सुजय विखे यांच्या अडचणींत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sujay-vikhe-patil

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यातच कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी मिळेल हे अद्यापि गुलदस्त्यात आहे. नगर दक्षिणचे भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांच्यावर भाजपमधील निष्ठावंतच नाराज असल्यामुळे त्यांची उमेदवारीही धोक्यात आली आहे. त्यातच आता विखे यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यात ते भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

दरम्यान, हा व्हिडीओ विखे हे काँग्रेसमध्ये असतानाचा असला तरीही ऐन निवडणुकीची उमेदवारी वाटप सुरू असताना तो व्हायरल झाल्याने त्यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सुजय विखे हे खासदार होण्यापूर्वीचा असल्याचे सांगण्यात येतेय. मात्र, एकेकाळी भाजपमध्ये येण्यापूर्वी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका करतानाचा विखेंचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजप निष्ठावंतांमध्ये त्यांच्याविषयी अधिकच नाराजी पसरली असल्याचे बोलले जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये खासदार सुजय विखे म्हणतात, ‘आज धर्म आणि जातीच्या नावावर विष कालविण्याचे काम कोणी केले असेल तर भारतीय जनता पक्षाने. एक छोटा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, जो कदाचित तुमच्या मनामध्येही आला नसेल. आणि मी जर खोटं बोलत असेन तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही भाजपच्या माणसाकडून घ्यावं. आज गाजावाजा करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळय़ाचे भूमिपूजन आणि उद्घाटन झालं. याबाबत मला मोदीसाहेबांनी सांगावं की, गुजरातमध्ये 36 महिन्यांत 3300 कोटी रुपये खर्च करून सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक उभारलं जाऊ शकतं, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला दोन वर्षे का लागतात? तुम्ही तीन वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले; पण आजपर्यंत त्यावर एक रुपयाही खर्च केला नाही. तुम्ही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे भूमिपूजन करायला आले तेव्हा पोटावर पट्टा बांधून समुद्रात गेले व तेथे तांब्यातून पाणी ओतले आणि निघून गेलात. पण ते पाणी नेमपं कुठं मुरतंय हे आजपर्यंत कोणाला सापडलं नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा 36 महिन्यांत 3300 कोटी खर्च करून उभा राहतो, तर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा का नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) द्यायला हवे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन केली जातात,’ अशी टीका विखे यांनी केली होती.