शेतकर्‍यांचे प्रश्न मांडण्यासाठी वैचारिकता लागते; सुजय विखेंचा विरोधकांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पारनेर

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले नेते आज आपल्याविरोधात प्रचार करीत आहेत. त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी माझ्यासाठी या भागातील शेतकर्‍यांचे आणि पाण्याचे प्रश्न महत्वाचे आहेत. या मतदारसंघात तीन वर्षे फिरून मी मतदारसंघातील प्रश्न समजून घेतले आहेत. या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी निवडणुकीत उतरलो आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा लोकसभेच्या सभागृहात विचार करुन प्रश्न मांडण्यासाठीच तुमचे प्रतिनिधीत्व करण्यात मला समाधान वाटेल, असे सांगत शेतकर्‍यांचे प्रश्न मांडण्यासाठी वैचारिकता पाठीशी लागते, असा टोला भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे.

डॉ.विखे पाटील यांनी शनिवारी पारनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये मतदारांच्या गाठीभेठी घेत आपली भूमिका मांडली. या भागातील पाणी समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांसाठी रोजगाराची संधी यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपण निवडणुकीत उतरल्याचे त्यांनी सांगितले. बाबुळवाडी, किन्ही, गोरेगाव, देवीभोयरे आदी ठिकाणी झालेल्या बैठकांमधून डॉ.सुजय यांनी दक्षिण भागातील पाणी प्रश्नावर भाष्य केले. येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा आपण संकल्प केला आहे. या भागात आपण तीन वर्षांपासून सातत्याने फिरत आहोत. त्यामुळे प्रश्नांचा अभ्यास झाला आहे. समोरच्या उमेदवाराला निवडणुका जाहीर झाल्यावर पारनेर तालुका आठवला. यापूर्वी त्यांना हा तालुका कधीही दिसला नाही. एका दिवसात चार सभा घेवून ते आता तालुक्याच्या पाणी प्रश्नांवर बोलत आहेत. मात्र, शेतकर्‍यांचे प्रश्न मांडण्यासाठी वैचारिकता पाठिशी लागते. या भागातील प्रश्नांसाठी बाळासाहेब विखे यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांची बांधिलकी ही शेतकर्‍यांशी होती. तोच विचारांचा वारसा आपण पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीत आरोप प्रत्योराप आणि हेवेदावे करण्यापेक्षा मला या भागातील समस्या सोडविण्यावर भर द्यायचा आहे. प्रत्येक गावात प्रादेशिक पाणी पुरवठा योजना असली पाहिजे. हा भाग टँकरमुक्त करणे, हेच आपले ध्येय आहे. त्यादृष्टीनेच लोकसभेत तुमचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी मी निवडणुकीत उभा असल्याचे त्यांनी सांगितले.