
सामना ऑनलाईन, मुंबई
मी माझ्याच नव्हे, तर सर्वांच्याच मुलांचे हट्ट पुरवतो. त्यांचे लाड करतो. इतरांची मुलं केवळ धुण्याभांडय़ांसाठी वापरणं हा शिवसेनेचा विचार कधीच असू शकत नाही. शिवसेना हा पक्ष सर्वसामान्यांसाठी आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना लगावला.
सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी सुजय विखे-पाटील यांच्याविषयी शरद पवार यांनी केलेल्या ‘मी दुसऱ्यांच्या मुलांचे हट्ट का पुरवू?’ या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.
या वेळी शरद पवारांच्या माढय़ातून उमेदवारी मागे घेण्याबाबत तसेच मोदी यांच्याविषयी केलेल्या भाकिताबाबत पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, ‘जे घडतंय ते शरद पवार यांच्या नीतीला शोभेल असंच घडत आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, मात्र ते जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं समजायचं असतं. शरद पवार हे अष्टपैलू आहेत. आतापर्यंत राजकीय नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ज्योतिषी म्हणून त्यांची अद्याप ओळख झालेली नाही.’
युती झाली आहे, दगाफटका होणार नाही!
जालन्याच्या जागेविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे दोघेही यासंदर्भात भेटणार असल्याचे सांगितले. पण युतीत कोणी आता मिठाचा खडा टाकणार नाही. युती झाली आहे. त्यामुळे आता कोणताही दगाफटका होणार नाही. शिवसेना-भाजप युती सर्वच्या सर्व जागा जिंकेल.
आदित्य ठाकरे या वेळी निवडणूक लढवणार नाहीत
आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर कधीच कोणतं बंधन टाकलं नाही. मीही आदित्यवर कोणतेही बंधन घातलेले नाही. त्यामुळे निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय तोच घेईल. मात्र या वेळी तो निवडणूक लढवणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवसैनिक ताकदीने सुजय यांच्यासोबत राहतील
शिवसेना-भाजपच्या हिंदुत्ववादी परिवारात सुजय यांच्यासारखा चांगला तरुण दाखल झाला आहे. शिवसैनिक त्यांच्यासोबत पूर्ण ताकदीने उभे राहतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर ठाकरे कुटुंबीयांशी आपले पूर्वीपासून ऋणानुबंध आहेत. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्री निवासस्थानी आल्याचे सुजय विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.
उमेदवार यादी दोन दिवसांत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरा ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीची रणनीती, प्रचाराची आखणी आदी विषयांवर सविस्तर चर्चा केली. याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रचाराचा आराखडा तयार करण्यात आला आहे. निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली असून बैठकीची ही पहिली फेरी आहे. उमेदवारांची यादीही लवकरात लवकर येत्या एक-दोन दिवसांत जाहीर केली जाईल’.






























































