लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे आणि निलश लंके यांच्या मालमत्तेमध्ये कमालीचा फरक दिसून येत आहे. दोन्ही उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून विखेंची मालमत्ता वाढल्याचे तर निलेश लंके यांची मालमत्ता घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निलेश लंके सर्वसामान्यांसाठी स्वतःची पदरमोड करून सेवाभाव करीत असल्याचे कागदोपत्री स्पष्ट झाले आहे.
सुजय विखे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सुजय व त्यांची पत्नी धनश्री व यांच्याकडे 29 कोटी 18 लाख रूपयांची संपत्ती आहे. गेल्या पाच वर्षात त्यांची संपत्ती 12 कोटी 32 लाख रूपयांनी वाढली आहे. सुजय यांच्याकडे 541 ग्रॅम सोने असून त्याचे बाजारमुल्य 35 लाख 33 हजार 513 रूपये इतके आहे. पत्नी धनश्री यांच्याकडे 690 ग्रॅम सोने असून त्याचे बाजारमुल्य 45 लाख 10 हजार 101 रूपये इतके आहे.
निलेश लंके व त्यांची पत्नी राणी यांच्याकडे स्थावर मालमत्ता 19 लाख 22 हजार 210 तर जंगम मालमत्ता 23 लाख 32 हजार 226 इतकी आहे. लंके यांच्या मालमत्तेमध्ये 35 लाख 24 हजार 295 रूपयांची घट झाली आहे. लंके यांच्यावरील कर्ज 37 लाख 48 हजार 757 इतके असून ते 2019 च्या तुलनेत ते वाढले आहे. निलेश लंके यांच्याकडे 1 लाख 47 हजार 100 रूपये किमतीचे 20 ग्रॅम सोने तर राणी लंके यांच्याकडे 2 लाख 6 हजार 250 रूपयांचे 30 ग्रॅम सोने आहे. सुजय विखे यांची बँक ठेव 5 कोटी 57 लाख रूपये तर धनश्री विखे यांची बँक ठेव 1 कोटी 91 लाख इतकी आहे. दुसरीकडे निलेश लंके यांच्याकडे 7 लाख 76 हजार 896 रूपये तर राणी लंके यांच्याकडे 31 हजार 834 रूपये इतकी ठेव आहे.
सुजय विखे यांची शेअर्स, म्युच्युअल फंडमध्ये 11 लाख 6 हजार इतकी गुंतवणूक आहे. तर धनश्री यांची 87 हजार इतकी गुंतवणूक आहे. दुसरीकडे दाम्पत्याची 20 हजार 910 रूपयांची सहकारी संस्थांमध्ये गुंतवणूक आहे. कर्जाच्या बाबतीत सुजय विखे यांच्यावर 4 कोटी 65 हजार रूपयांचे तर धनश्री यांच्यावर 1 कोटी 47 लाखांचे कर्ज आहे. निलेश लंके यांच्यावर 37 लाख 48 हजार 757 रूपयांचे कर्ज आहे. राणी लंके यांच्यावर मात्र काहीही कर्ज नाही. सुजय विखे यांच्याकडे 26 एकर जमीन आहे, धनश्री यांच्याकडे 27 एकर जमीन तर निलेश लंके यांच्या नावे केवळ 10 गुंठे जमीन आहे. सुजय विखे यांचा आयुर्विमा 13 लाख 56 हजार, धनश्री यांचा 78 हजार तर निलेश लंके व राणी लंके यांची विमा तरतुद शुन्य आहे. सुजय विखे व धनश्री विखे यांच्यावर एकही सामाजिक गुन्हा दाखल नसताना निलेश लंके यांच्यावर मात्र कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी सुपे, ता. पारनेर येथे केलेल्या रस्ता रोको आंदोलनाचा गुन्हा दाखल आहे.