
तमाशा फडावरची लावणी रुपेरी पडद्यावर आणि थेट माजघरात लोकप्रिय करण्याचे श्रेय सुलोचना चव्हाण यांना जाते. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘आई मला नेसव शालू नवा’, ‘खेळताना रंग बाई होळीचा’, ‘फड सांभाळ तुऱयाला गं आला’ अशा एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्यांना आपला खर्जातला आवाज देऊन रसिकांना तृप्त केले .
मुखड्याची सुरुवात ठसकेबाजच हवी
लावणी आणि सुलोचना चव्हाण असे एक अतूट नाते होते. ‘औंदा लगीन करायचं’, ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘कळीदार कपुरी पान’, ‘खेळतांना रंग बाई होळीचा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘फड सांभाळ तुऱयाला गं आला’, ‘मी बया पडले भिडची, ग बाई भिडची’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’ अशा त्यांच्या अनेक लावण्या आजही लोकप्रिय आहेत. पाठीमागे अंतरे कसेही असोत, पण लावणीच्या मुखडय़ाची सुरुवात ठसकेबाजच झाली पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते.
वयाच्या नवव्या वर्षी पहिले गाणे
‘श्रीकृष्ण बालमेळा’तील रंगभूषाकार दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्यांच्या ओळखीतून संगीत दिग्दर्शक श्याम बाबू पाठक यांच्याकडे सुलोचनाबाईंनी वयाच्या नवव्या वर्षी ‘कृष्ण सुदामा’ या हिंदी चित्रपटात पहिले चित्रपटगीत गायले. करीअरच्या सुरुवातीलाच आघाडीच्या गायकांसोबत गाण्याची संधी त्यांना मिळाली. मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर त्यांनी मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर या आघाडीच्या गायकांसोबत गायला सुरुवात केली. मराठीसह हिंदी, गुजराती, भोजपुरी, तमीळ, पंजाबी अशा अनेक भाषांत त्यांनी गाणी गायली.
बालमेळ्यातून कलाक्षेत्रात पदार्पण
सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 रोजी गिरगावातील फणसवाडीचा. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे व्हायचे. ‘श्रीकृष्ण बालमेळा’ या नावाने सुलोचना यांच्या घरचाच एक मेळा होता. याच बालमेळय़ातून त्यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात त्यांनी बालभूमिका साकारल्या. त्यांच्या मोठय़ा भगिनीने त्यांना कलाक्षेत्रासाठी प्रोत्साहन दिले. सुलोचना यांनी गायनाचे कोणतेही शास्त्राrय शिक्षण घेतले नाही. ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज करायच्या.
…अन् मिळाला ‘लावणीसम्राज्ञी’ किताब
आचार्य अत्रे यांच्याकडूनच त्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब मिळाला. ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटातील सुलोचना यांच्या लावण्या खूपच गाजल्या. खेबुडकरांनी लिहिलेल्या लावणीचा मुखडा होता ‘मला हो म्हणतात लवंगी मिरची’ हा त्यांच्या करीअरचा टर्निंग पॉइंट ठरला. पुढे ‘सवाल माझा ऐका’ या चित्रपटातही होता. त्यातील सुलोचनाबाईंनी गायलेल्या, ‘कसं काय पाटील बरं हाय कां?’ व ‘सोळावं वरीस धोक्याचं गं’ या लावण्या तुफान गाजल्या.
हिंदी गाणीही ठरली लोकप्रिय
ज्ञानदत्त आणि शामसुंदर हे सुलोचनाबाईंचे आवडते संगीतकार. ज्ञानदत्त यांच्या ‘दुखियारी’, ‘लाल दुपट्टा’, ‘नाँव’ आदी चित्रपटांत त्यांनी गाणी गायली. शामसुंदर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली 1951 सालच्या ‘ढोलक’ आणि ‘काले बादल’ या चित्रपटांत त्यांनी कमाल करून दाखवली. ‘इस दुनिया में क्या होता’, ‘किसी मजबूर का जलता हुआ’ ही ‘काले बादल’मधील गाणी आणि ‘छलक रहा है’ आणि ‘चोरी चोरी’ ही ‘ढोलक’मधील गाणी तुफान लोकप्रिय झाली. रफीबरोबर त्यांनी ‘मगर ए हसीन, ऐ बेखबर’ हे अविस्मरणीय गीत गायले. ‘दुश्मनी’, ‘बाबूजी’, ‘सागर’, ‘दामाद’ त्यांचे अन्य उल्लेखनीय चित्रपट.‘दुश्मनी’ मधील ‘फिर लौट के आजा’ हे त्यांचे गीत लोकप्रिय ठरले. सुलोचनाबाईंची जवळपास पाऊणशे हिंदी गाणी आहेत हे रेडिओ सिलोनमुळे संगीत श्रोत्यांना कळले. त्यांची हिंदी गाणी ‘के. सुलोचना’ नावाने वाजवली जात.
‘हीच माझी लक्ष्मी’मध्ये पहिली लावणी
सुलोचनाबाई लहानपणी लावणी गुणगुणत असत. त्यासाठी त्यांनी आईकडून अनेकदा ओरडादेखील खाल्ला होता; पण पुढे मराठी चित्रपटातील लावणी गायन ही त्यांची ओळख बनली. सुलोचनाबाईंनी पहिली लावणी आचार्य अत्रे यांच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ या चित्रपटात गायली. त्याचे संगीतकार होते वसंत देसाई. ‘मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी…’ असे या लावणीचे बोल होते. 1952 च्या सुमारास ‘कलगी तुरा’ या चित्रपटासाठी राजा बढे यांनी रचलेल्या काही लावण्या त्यांनी गायल्या. शामराव चव्हाण यांनी त्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. पुढे शामराव यांच्यासोबत त्या विवाहबद्ध झाल्या. लावणी गायनात सुरांची नजाकत आणि शब्दफेक याचे धडे सुलोचनाबाईंना शामरावांनी दिले.
आईच्या निधनाच्या बातमीनंतरही त्या गात राहिल्या…
इतरांच्या मदतीसाठी सुलोचनाबाई कायम पुढे असायच्या. याचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे, जन्मदात्या आईच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी त्या कार्यक्रम करण्यासाठी मंचावर उभ्या राहिल्या. त्यावेळी माईंनी विदर्भामध्ये आठ शाळांच्या मदतीसाठी काही कार्यक्रम घेतले होते. या कार्यक्रमातून आलेली रक्कम त्या मुलांसाठी शाळा उभारण्यात खर्च होणार होती. मात्र, आईचे निधन झाले असताना त्या फक्त मुलांच्या मदतीसाठी डोळ्यात पाणी घेऊन मंचावर गाण्यासाठी उभ्या राहिल्या. त्यानंतर त्यांनी आपले गाव गाठून आईचे उत्तरकार्य पूर्ण केले.




























































