
हिंदुस्थानचा स्टार टेनिसपटू सुमित नागलने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी देताना ग्रॅण्ड पराक्रम केला. त्याने पहिल्या फेरीत 31 व्या मानांकित कझाकिस्तानच्या अलेक्झांडर बुबलिकचा पराभव करत इतिहास रचला. तब्बल 34 वर्षांनंतर म्हणजे 1989 नंतर प्रथमच ग्रॅण्डस्लॅम मानांकन असलेल्या खेळाडूला हरवणारा सुमित नागल हा पहिला हिंदुस्थानी टेनिसपटू ठरला.
सुमित नागलला 2021 च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री मिळाली होती, मात्र त्यावेळी त्याला सलामीलाच पराभवाचा धक्का बसला होता. यावेळी मात्र सुमितने अॅलेक्झांडर बुबलिकवर 6-4, 6-2, 7-6(5) असा विजय मिळवित दुसरी फेरी गाठली. सुमितने दुसऱयांदा ग्रॅण्डस्लॅमच्या मुख्य स्पर्धेत विजय मिळविला आहे. याआधी 2020 च्या यूएस ओपनमध्ये तो मुख्य ड्रॉमध्ये एक सामना जिंकण्यात यशस्वी ठरला होता. टेनिस क्रमवारीत अव्वल 100 मध्ये स्थान मिळविणाऱया खेळाडूला सुमितने सातव्यांदा पराभूत करण्याचा पराक्रम केलाय.
सुमितचे पहिल्या सेटपासून वर्चस्व
पात्रता फेरीत एकही सेट न हरलेल्या सुमित नागलने मुख्य फेरीतही पहिल्या सेटपासूनच वर्चस्व गाजवले. त्याने तीन वेळा अलेक्झांडरची सर्व्हिस तोडली आणि पहिला सेट 6-4 असा सहज जिंकला. मनोबल उंचावलेल्या सुमितने दुसऱया सेटमध्ये अॅलेक्झांडरला चुका करण्यास भाग पाडत हा एकतर्फी सेट 6-2 अशा फरकाने जिंकला. तिसऱया सेटमध्ये उभय खेळाडूंमध्ये निकराची झुंज बघायला मिळाली. टायब्रेकपर्यंत ताणलेल्या या सेटमध्ये 7-6 अशी बाजी मारत सुमितने ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली.
सुमितमुळे रमेश कृष्णनची आठवण
सुमित नागल 2013 नंतर एकेरीची दुसरी फेरी गाठणारा पहिला हिंदुस्थानी पुरुष टेनिसपटू ठरला. या स्पर्धेत सोमदेव देववर्मनने 2013 मध्ये दुसऱया फेरीत प्रवेश केला होता. 1989 नंतर पहिल्यांदाच हिंदुस्थानी खेळाडूने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकेरी सामन्यात मानांकित खेळाडूचा पराभव केला आहे. रमेश कृष्णन यांनी 1989 ही कामगिरी केली होती. त्यानंतर दुसऱया फेरीत त्याने स्वीडनच्या मॅट्स विलँडरचा पराभव केला. विलँडर तेव्हा टेनिस क्रमवारीत जगातील अव्वल खेळाडू होता.



























































