सावधान! उन्हाळ्यात कोल्डड्रिंक्स आणि चिप्स खाणं ठरतंय आरोग्यासाठी घातक; काय म्हणाले तज्ज्ञ? वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात अनेक राज्यांमध्ये उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर जाणवत असून नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले आहेत. उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण शीतपेयांकडे वळत आहेत. मात्र, तुम्ही थंड पेयांसोबत चिप्स खाण्याचे शौकीन असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचे दिल्ली AIIMS च्या चीफ डायटिशियन डॉ. परमीत कौर यांनी सांगितले.

तीव्र उष्णतेमुळे सध्या उष्माघाताचा धोका वाढला असून अशा वेळी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी द्रव आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु थंड पेये आणि चिप्स एकत्र खाणे टाळावे. लोकांना वाटते की शीतपेयांमुळे तहान भागते. मात्र, वास्तवात त्यातील साखरेचे उच्च प्रमाण शरीरातील पाण्याची पातळी अधिक कमी करते. त्यातच चिप्समधील अति मीठ आणि ट्रान्स फॅटमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच चिप्सच्या नियमित सेवनाने लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. टिव्ही 9 ने याबाबत माहिती दिलेली आहे.

या उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी शीतपेय टाळून नारळ पाणी किंवा लिंबू पाणी पिणे जास्त फायदेशीर ठरेल. घरच्या घरी ओआरएस तयार करणे हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी एक लिटर पाण्यात सहा चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ मिसळून ते पाणी दिवसभर थोडे थोडे प्यावे. तहान नसली तरीही सतत पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय चिप्सऐवजी भाजलेले मखाणे आणि आहारात टरबूज व खरबूज यांसारख्या मोसमी फळांचा समावेश करणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.