Summer Lunch Box – उन्हाळ्यात टिफीनमधील भाजी खराब होत असेल तर, या सोप्या उपायांकडे लक्ष द्यायला हवं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आॅफिसमधला लंच बाॅक्स काय करावं हा गृहिणींना पडणारा सर्वसामान्य प्रश्न. परंतु हा टिफीन खराब झाल्यावर मात्र निराशा पदरी पडते. उन्हाळ्यात डब्यातील भाजी खराब होण्याचे प्रमाण वाढते. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अन्न शिजवताना काळजी घ्यायला हवी. उन्हाळा सुरू झाला की उष्णतेमुळे अन्न लवकर खराब होण्याची समस्या वाढते. तापमान वाढल्याने बॅक्टेरिया जलद गतीने वाढतात आणि त्यामुळे अन्नाची ताजेपणा कमी होतो. अनेकदा सकाळी बनवलेले अन्न दुपारपर्यंत खाण्यास योग्य राहत नाही. यामुळे अन्न वाया जातेच, पण अन्नातून विषबाधा, पोटदुखी, जुलाब यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. मात्र काही सोप्या सवयी अंगीकारल्यास उन्हाळ्यातही अन्न अधिक वेळ ताजे आणि सुरक्षित ठेवता येते.

स्वयंपाक करण्यापूर्वी हात नीट धुणे आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. भाज्या आणि डाळी शिजवण्यापूर्वी नीट धुवाव्यात, कारण कच्च्या पदार्थांमध्येही बॅक्टेरिया असू शकतात. स्वयंपाक केल्यानंतर अन्न जास्त वेळ उघड्यावर ठेवू नका. उघड्या अन्नामध्ये बॅक्टेरिया लवकर वाढतात. अन्न थंड झाल्यावर ते झाकून ठेवा आणि शक्य असल्यास लगेच फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिज उपलब्ध नसेल तर अन्न थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवा.

अन्न ठेवण्यासाठी नेहमी स्वच्छ भांडी वापरणे महत्त्वाचे आहे. स्टील किंवा काचेच्या भांड्यांमध्ये अन्न ठेवणे अधिक सुरक्षित मानले जाते. तसेच भांडी नीट धुतलेली नसतील तर अन्न लवकर खराब होऊ शकते.

डाळी, तांदूळ आणि भाज्या यांसारख्या पदार्थांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते लवकर खराब होतात. त्यामुळे हे पदार्थ नीट उकळून किंवा पूर्णपणे शिजवून घ्यावेत, जेणेकरून त्यामधील बॅक्टेरिया नष्ट होतील. उरलेले अन्न पुन्हा खायचे असल्यास ते चांगले गरम करूनच खावे. गरम केल्यामुळे अन्नातील हानिकारक जीवाणू कमी होतात आणि अन्न अधिक सुरक्षित होते. ऑफिस, शाळा किंवा पिकनिकसाठी अन्न घेऊन जाताना ते हवाबंद डब्यात पॅक करा. तसेच इन्सुलेटेड बॅग किंवा थर्मल कॅरियर वापरल्यास अन्न अधिक वेळ ताजे राहते.