शेवटचा रविवार; उमेदवारांची धावपळ, नेत्यांनी मैदान गाजवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा रविवार होता. त्यामुळे उमेदवारांची एकीकडे मतदारांना गाठण्यासाठी धावपळ सुरू होती, तर दुसरीकडे नेत्यांच्या सभांचा धडाका उडाला होता. गल्लीबोळात, वाडय़ा-वस्त्यांवर उमेदवारांचे नमस्कार-चमत्कार सुरू होते, तर त्याच वेळी मैदानात नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत होते. शेवटचा रविवार प्रचारासाठी सन्डे ब्लॉकबस्टरच ठरला.

थकलेले एकमेकांना आधार देऊ शकतात,पण राज्याला नाही
थकलेले सहकारी एकमेकांचा आधार बनू शकतात, पण राज्याला आधार देऊ शकत नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दोन्ही काँग्रेसवर निशाणा साधला. मोदींच्या जळगाव आणि भंडाऱयात सभा झाल्या.

तरुण नोकरी मागतात, मोदी चंद्र दाखवतात
तरुण नोकरी मागतात तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना चंद्र दाखवतात, असा टोला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला. लातूरमधील औसा आणि मुंबईत त्यांच्या सभा झाल्या.

…मग ते 40 वर्षे गवत उपटत होते का?
अनेक वर्षांचे सहकारी सोडून गेले. आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असे सांगतात. मग 40 वर्षे ते काय गवत उपटत होते काय? असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मधुकर पिचड यांचे नाव न घेता केला. नगरमधील अकोल्यात पवार यांची सभा झाली.