
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या लढतीआधी मी हिंदुस्थानी संघाला सावधानतेचा इशारा दिला होता, पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा परिणाम पराभवात झाला. आता तरी बांगलादेश संघाला कमी लेखण्याची चूक करू नका, असा गंभीर इशारा हिंदुस्थानी संघाचे माजी कर्णधार ‘लिटल मास्टर’ सुनील गावसकर यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला दिला आहे.
हिंदुस्थानला पाकिस्तानवर अखेरच्या चेंडूवर विजय मिळवता आला होता. दुसऱया सामन्यात त्यांनी नेदरलँड्सवर मोठा विजय मिळवला होता, पण तिसऱया महत्त्वाच्या लढतीत हिंदुस्थानला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. आता हिंदुस्थानची लढत शेजारी बांगलादेशबरोबर आहे, पण या सामन्यापूर्वी आता गावसकर यांनी हिंदुस्थानी संघाला सावधानतेचा गंभीर इशारा दिला.
‘झिम्बाब्वेच्या संघाने पाकिस्तानवर विजय मिळवला, पण त्यानंतर बांगलादेशने झिम्बाब्वेवर विजय साकारला. बांगलादेशचा संघ हा सध्याच्या घडीला उत्तम लयीत आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंनी आपला सर्वोत्तम खेळ करीत संघाला विजय मिळवून देण्यासाठी झुंजायला हवे,’ असे गावसकर शेवटी म्हणाले.



























































