ऍण्टेलिया स्फोटके प्रकरण- पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅण्टेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एपीआय सचिन वाझे आणि रियाज काझी यांच्यानंतर एनआयएने गुरुवारी रात्री पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक केली. माने यांना आज विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता 28 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

अॅण्टेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात चौकशीसाठी एनआयएने गुरुवारी सुनील माने यांना बोलावले होते. त्यानुसार दुपारच्या सुमारास माने एनआयए कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर दिवसभर चौकशी केल्यानंतर माने यांचा या प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. आज माने यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सुनील माने यांना 28 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली. दरम्यान, यापूर्वी एनआयएने सुनील माने यांचा जबाब नोंदवला होता. तसेच एटीएसनेदेखील माने यांची चौकशी केली होती. सुनील माने हे सद्या सशस्त्र विभागात कार्यरत होते. अॅण्टेलिया स्पह्टक आणि मनसुख हिरेन हत्याकांड घडले तेव्हा सुनील माने मुंबई गुन्हे शाखेच्या युनीट-11चे प्रभारी निरीक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, सचिन वाझे आणि रियाज काझी या दोघांची न्यायालयीन कोठडी 5 मेपर्यंत वाढवली आहे.