नारायणचा नकार; टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही

आयपीएल गाजवत असलेला सुनील नारायण आगामी टी-20 वर्ल्ड कपही गाजवू शकतो, असा साऱयांना विश्वास होता. त्यामुळे गेल्या वर्षी वेस्ट इंडीज संघातून निवृत्त झालेल्या सुनील नारायणने आपली निवृत्ती मागे घेत मायदेशात होत असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळावे, अशी सर्वांचीच इच्छा होती, पण नारायणने आपला स्पष्ट शब्दांत नकार कळवला आहे. त्यामुळे त्याचा झंझावात फक्त आयपीएल आणि जगातील लीग क्रिकेटमध्येच दिसू शकेल, हे निश्चित झाले आहे.

टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर सर्व संघ तयारीला लागले आहेत. यंदाचा टी-20 विश्वचषक वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणार आहे. अशा स्थितीत वेस्ट इंडीजला घरच्या मैदानाचा फायदा मिळू शकतो. वेस्ट इंडीजचा संघ आणखी मजबूत करण्यासाठी कर्णधार रोव्हमन पॉवेल आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या सुनील नारायणला निवृत्तीतून माघार घेण्याची विनंती केली. तेव्हापासून नारायणच्या निर्णयाबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. अखेर आज त्याने सर्वांचा हिरमोड केला आहे.

आज नारायणने ‘एक्स’वर टी-20 वर्ल्ड कपबाबत भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, माझी आयपीएलमधील कामगिरी पाहून अनेकांनी मला वर्ल्ड कपसाठी निवृत्ती मागे घेण्यासाठी प्रेरित केले. हे पाहून मला खूप आनंद झाला. माझ्याबद्दल प्रेम दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार. पण मी जो निर्णय घेत शांतता पाळली आहे तीच मी कायम ठेवणार आहे. मला आता निराश व्हायचे नाहीय, मात्र जे खेळाडू विंडीजसाठी मैदानात उतरणार आहे, मी त्यांच्या पाठिंब्यासाठी नेहमीच तयार आहे. जे गेले अनेक महिने ते संघात येण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत, त्यांचाच हा हक्क आहे. त्यांनी जगाला दाखवून द्यावे की, आम्ही जगज्जेतेपदासाठी सक्षम आहोत.

येत्या 1 जूनपासून अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अमेरिका आणि पॅनडा यांच्यात होणार आहे. 1 जून ते 18 जून या कालावधीत साखळी सामने खेळवले जातील. यानंतर 19 जून ते 24 जूनदरम्यान सुपर-8 टप्प्यातील सामने होणार आहेत. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने 26 आणि 27 जून रोजी होणार आहेत. त्याचबरोबर टी-20 विश्वचषक 2024 चा विजेतेपदाचा सामना 29 जून रोजी होणार आहे.