विक्रोळी कन्नमवार नगरात म्हाडाच्या भूखंडावर पार्किंग प्लॉट बनवा! सुनील राऊत यांनी घेतली म्हाडा उपाध्यक्षांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर आणि टागोरनगरमध्ये सर्वात मोठी म्हाडाची वसाहत असून येथील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाची कामे सुरू झाली आहेत. तसेच भविष्यातही अनेक इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात येथे पार्किंगची समस्या गंभीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर येथे म्हाडाच्या मोकळय़ा भूखंडावर पार्किंग प्लॉट बनवून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनाल राऊत यांनी म्हाडाकडे केली आहे.

कन्नमवार नगर, टागोरनगरमधील म्हाडाच्या वसाहतीमधील अनेक इमारती 50-60 वर्षे जुन्या आहेत. त्यापैकी काही इमारतींच्या पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. सदर इमारतीच्या पुनर्विकासासाठी पाच एफएसआय दिला जात आहे. खासगी विकासक सोसायटीच्या माध्यमातून पुनर्विकास करत असल्याने परिसरातील मोकळी जागा कमी होत आहे. रस्त्यापासून नऊ फूट अंतरावर इमारती झाल्या असल्याने भविष्यात रस्त्याचे रुंदीकरण होऊ शकणार नाही. 25 मजल्यांच्या इमारतीत 120 सदनिका निर्माण होणार असल्याने एकटय़ा कन्नमवार नगरात दीड लाख घरे तयार होणार आहेत. मात्र पुनर्विकसित इमारतीत विकासक केवळ 50-60 वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे भविष्यात येथील रहिवाशांनी आपली वाहने कुठे पार्किंग करायची, असा प्रश्न उभा राहणार आहे. त्याची दखल घेत आमदार सुनील राऊत यांनी आज म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची भेट घेत भविष्यातील पार्किंगची समस्या विचारात घेऊन म्हाडाने आपल्या मोकळय़ा भूखंडावर पार्किंग प्लॉट निर्माण करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. तसेच पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी म्हाडा आणि पालिकेच्या संबंधित अधिकाऱयांची संयुक्त बैठक घ्यावी असेही स्पष्ट केले.

संक्रमण शिबीर वसाहतीमधील दुकानदारांना पर्यायी जागा द्या

कन्नमवारनगर येथील म्हाडा संक्रमण शिबीर वसाहतीत 200 हून अधिक दुकानदार 40 वर्षापासून आहेत. सर्व पुरावे असतानाही म्हाडाने त्यांच्यावर कारवाई केली. दरम्यान, सरकारने 2011 पर्यंतच्या सर्व झोपडीधारकांना, गाळेधारकांना संरक्षित केले आहे. तसेच म्हाडा संक्रमण शिबिरातील अधिकृत, अपात्र, भाडेकरू-रहिवाशांना पुनर्विकसित होणाऱया इमारतीमध्ये गाळेवाटप करण्याचे निर्देश दिले आहे. असे असतानाही या दुकानदारांवर वेगळी कारवाई करणे अन्यायकारक आहे. याबाबत एकता व्यापारी सेवा संघाच्या निवेदनाची दखल घेतली जात नसल्याचे निदर्शनास आणून देत, सदर दुकानदारांवर अन्याय करू नये अशी मागणी आमदार सुनील राऊत यांनी म्हाडा उपाध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली. तसेच त्यांना पर्यायी जागा देण्याचा निर्णय घ्यावा, असे राऊत यांनी स्पष्ट केले.