विक्रोळीतील प्रलंबित कामे पूर्ण करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन; सुनील राऊत यांचा पालिकेला इशारा

विक्रोळी मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार सुनील राऊत यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. रखडलेल्या कामांबाबत आज सुनील राऊत यांनी पालिका प्रशासनासोबत बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी विकासकामांचा आढावाही घेतला.

विक्रोळी मतदारसंघामध्ये अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रलंबित कामांसाठी विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणीही त्यांनी बैठकीत केली.

पालिका उपायुक्त संतोषकुमार धोंडे यांनी संबधित विभागांना सदर समस्या सोडवण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. तसेच पुढील 7 दिवसांनंतर काम किती पूर्ण झाले याबाबत पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्याचं आश्वासन आमदार सुनील राऊत यांना पालिकेने दिले. यावेळी शिवसेनेचे सर्व शाखाप्रमुख, पदाधिकारी यांच्यासह सहाय्यक आयुक्त अलका ससाने उपस्थित होत्या.

ही कामे पूर्ण करा

विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणाऱया पुलाचे उर्वरित काम पूर्ण करावे.

कन्नमवारनगर येथील महात्मा फुले रूग्णालय, टागोरनगर आंबेडकर रूग्णालय, कांजूर महापालिका आरोग्य केंद्र या रुग्णालयांच्या पुनर्विकासाबाबत निर्णय घ्यावा.

नामदेवराव पाटणे मार्ग आणि परेश पारकर जंक्शन ते रामभजन कंपाऊंडपर्यंत नियमित रेषा करावी. भांडुप एम. डी. केणी ते नाहूर रोड रुंदीकरणाबाबत कार्यवाही करावी.

टागोरनगर स्मशानभूमी येथील विद्युतशव वाहिनी सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा आणि विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणाऱया पुलाचे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल असे नामकरण.