बुरशीजन्य कोळे रोगाने सुपारी बागायतीला उतरती कळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूर तालूक्यातील भू पंचक्रोशी ही आंब्याच्या लागवडीप्रमाणेच सुपारी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेली 10-12 वर्षे या सुपारी बागायतीला उतरती कळा आली आहे. कारण सुपारीवर आलेला बुरशीजन्य कोळे रोग. वारंवार सुपारीच्या झाडावर कोळे रोग येत असल्यामुळे उत्पादन घटून बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे .

सर्वसामान्य जून ते जानेवारी हा काळ सुपारी तयार होण्यासाठी पोषक आहे. पूर्वी याच काळात सुपारी उत्पादन चांगले होत असे. मात्र सन 2007 सालपासुन आलेल्या बुरशीजन्य कोळे रोगामुळे होणारी हंगामा अगोदरची फळगळ ही शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय बनत चालली आहे. बहुतेक सर्वच शेतकरी या समस्येने ग्रासले आहेत.काही शेतकऱ्यांनी तर या समस्येमुळे सुपारी बागायत नष्ट ही केल्या आहेत.

दापोली कृषीविद्यापिठाचे तज्ञ पण या समस्येवर उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र अद्याप यश आलेल नाही. या रोगाच्या पार्श्वभूमीवर दि 7 संप्टेंबर रोजी राजापूर मंडळ कृषी आधिकारी श्रीमती घारगे व कृषी विभागाचे श्री महाले यांनी सुपारी बागायतींची प्रत्यक्ष पहाणी केली. या प्रसंगी सुपारी पिकाला विमा संरक्षण मिळावे अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. कृषीविभागाकडून यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याच आश्वासन यावेळी श्रीमती घारगे यांनी दिले.