
मंगळवार, 14 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेच्या रात्री आकाशात सुपरमूनचे दर्शन होणार आहे. यावेळी चंद्र रोजच्यापेक्षा अधिक तेजस्वी दिसेल. खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले की, चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लक्ष 84 हजार किलोमीटर अंतरावर असतो. जर पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर तो आकाराने 14 टक्के मोठा व तीस टक्के जास्त तेजस्वी दिसतो. अशा चंद्राला ‘सुपरमून’ म्हणतात.
मंगळवार 14 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून 3 लाख 57 हजार 434 किलोमीटर अंतरावर पृथ्वीजवळ येणार आहे. त्या दिवशी सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी चंद्र पूर्वेला उगवेल. रात्रभर आपल्याला सुपरमूनचे दर्शन देऊन तो सकाळी 6 वाजून 29 मिनिटांनी पश्चिमेस मावळेल. या वर्षातील शेवटचे सुपरमून दर्शन आषाढ पौर्णिमेच्या रात्री बुधवार, 13 जुलै 2022 रोजी होणार आहे. त्यावेळी पावसाळय़ामुळे आकाश अभ्राच्छादित असण्याची शक्यता आहे.

























































