पंतप्रधानपदावरून भाजपला धक्का, नितीशकुमार ‘पीएम’ पदाचा चेहरा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nitish-modi

सामना ऑनलाईन । पाटणा

एकटे भाजप अध्यक्ष अमित शहा सोडले तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा येईल याची खात्री सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापासून योगगुरू रामदेवबाबा यांच्यापर्यंत भल्याभल्यांना वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे एनडीएमधील घटक पक्षांबरोबरच विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांच्या ‘पीएम’ पदाच्या आकांक्षेला धुमारे फुटू लागले आहेत.

संयुक्त जनता दलाने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी आज एका भाजप नेत्यानेच पुढे रेटले. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांना आतापासून डोकेदुखी सुरू झाली आहे.

नितीशकुमार ‘पीएम’ पदाचा चेहरा: जदयु

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे ‘एनडीए’चे दावेदार असतील, पण पंतप्रधानपदाबाबत चर्चा होणार असेल तर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे त्या पदासाठीचे ‘टॉप’चे उमेदवार असतील अशी भूमिका संयुक्त जनता दलाने आज घेतली. नितीशकुमार यांची राजकीय कारकीर्द देशभरात प्रेरणादायक मानली जाते. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली बिहारचा अभूतपूर्व विकास झालेला आहे, असे संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी म्हटले आहे. नितीशकुमार हेसुद्धा पंतप्रधान पदासाठीचा चेहरा असतील, अशी भूमिका ‘जदयु’ने घेतल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

ममता पहिल्या बंगाली पंतप्रधान होतील: दिलीप घोष

सीपीआयचे आमच्या पश्चिम बंगालमधील ‘पुराणपुरुष’ नेते ज्योती बसू हे पंतप्रधानपदाच्या समीप पोहोचले होते, पण त्यांच्या पक्षाने ते घडूच दिले नाही. मात्र ममता बॅनर्जी या पहिल्या बंगाली मुख्यमंत्री होऊ शकतील. त्यासाठी त्या पहिल्या क्रमांकाच्या नेत्या आहेत, असे पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे. दिलीप घोष यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना वाढदिवसानिमित्त शनिवारी भरभरून शुभेच्छा दिल्या. आमच्या पश्चिम बंगालचे भवितव्य ममतादीदींच्या सफलतेवर अवलंबून आहे. त्यांना दीर्घायूरोग्य लाभो, त्यांना यश मिळो अशीच प्रार्थना आपण करतो, असेही घोष म्हणाले. मात्र त्यांनी ममता बॅनर्जी यांना पंतप्रधानपदासाठी पसंती दिल्याने भाजपमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.