
घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणाऱया एका जोडप्याला सर्वोच्च न्यायालयाने भावनिक सल्ला दिला. एकदा डिनर डेटवर जा. कॉफी पित एकमेकांशी बोला. त्याची व्यवस्था आम्ही करतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. कोर्टाने जोडप्याला म्हटले की, कोर्टरूमच्या बाहेर शांतपणे आपल्या मतभेदांवर विचार करा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. जोडप्याला डिनर डेटवर जायचा सल्लाही दिला. कारण या सगळ्या वादविवादाचा परिणाम त्यांच्या तीन वर्षांच्या मुलावरही पडेल. हे प्रकरण न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आले होते. पत्नी फॅशन उद्योजिका आहे. तिला आपल्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन युरोप टुरवर जायचे आहे. तशी परवानगी तिने मागितली होती. मुलाच्या कस्टडीवरून दोघांमध्ये वाद सुरू आहेत. या वादाचा परिणाम त्यांच्या मुलाच्या भविष्यावर पडेल यावर न्यायालयाने चिंता व्यक्त केली. कोर्टाची पँटिंग एवढी चांगली नाही, त्यामुळे जोडप्याला दुसऱ्या ड्रॉइंग रूमचा पर्याय देत असल्याची मजेशीर टिप्पणी न्यायालयाने या वेळी केली.