केवळ सूनेसोबत भांडणे म्हणजे ‘छळ’ नव्हे; सुप्रीम कोर्टाचा सासू-सासऱ्यांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केवळ सूनेसोबत सासू-सासऱ्यांचे भांडण होणे याला वैवाहिक क्रूरता किंवा छळ म्हणता येणार नाही. क्रूरतेचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी केवळ सुनेसोबतचे भांडण पुरेसे ठरत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. हा निर्वाळा देत न्यायालयाने सासू-सासऱ्यांना मोठा दिलासा दिला.

विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपावरुन सासू-सासऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 498A अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याला आव्हान देत सासू-सासूऱ्याने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. खंडपीठाने प्रकरणातील संपूर्ण वस्तुस्थिती विचारात घेतली आणि याचिकाकर्त्या सासू-सासऱ्यांविरोधातील हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्दबातल ठरवला.

वृद्ध सासू-सासऱ्याविरोधातील छळाचे आरोप तथ्यहिन असल्याचे न्यायालयाने म्हटले. केवळ सासू-सासऱ्यांनी सूनेसोबत भांडण केले आहे, या एका गोष्टीवरुन त्यांनी सूनेचा छळ केल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. केवळ सूनेसोबत भांडणे म्हणजे त्याला क्रूरता वा वैवाहित छळ म्हणता येणार नाही, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आणि सासू-सासऱ्यांना दिलासा दिला.