शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी, दीड वर्षानंतर मुहूर्त

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवार, 7 मे रोजी सुनावणी होणार आहे. तब्बल दीड वर्षाने या सुनावणीला मुहूर्त मिळाला आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिंधे गटाला दिले. त्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याची प्राथमिक सुनावणी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर झाली होती. सप्टेंबर 2023 मध्ये यावर शेवटची सुनावणी झाली. येत्या बुधवारी न्या. सूर्य कांत व न्या. एन. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे व 40 आमदारांनी गद्दारी केल्यानंतर निवडणूक आयोगासमोर शिवसेना नाव व चिन्हाची सविस्तर सुनावणी झाली. संसदेतील व विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे आयोगाने मिंधे गटाला शिवसेना नाव व चिन्ह दिले. त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यानंतर ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे.

राष्ट्रवादीची सुनावणी 14 मे रोजी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व घडय़ाळ चिन्हाची सुनावणी 14 मे रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी नाव, घडय़ाळ चिन्ह अजित पवार गटाला दिले. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.