
बेपर्वाईने गाडी चालवणाऱ्यांना किंवा स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावणाऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. रस्ते अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला. कुटुंबीयांची 80 लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. एन. एस. रवीश हे त्यांचे वडील, बहीण आणि मुले यांच्यासह कारने प्रवास करत असताना कर्नाटकातील मालनहल्लीजवळ त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्या वेळी रवीश वेगाने गाडी चालवत होते. त्यानंतर रवीश यांची पत्नी, मुलगा आणि पालकांनी विमा कंपनीकडे 80 लाख रुपयांची भरपाईची मागणी केली. पोलिसांनी आरोपपत्रात रवीश हे बेपर्वाईने गाडी चालवत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे नमूद केले.
l मोटार अपघात न्यायाधिकरणाने रवीश यांच्या कुटुंबाचा दावा फेटाळून लावला. नंतर त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आणि दावा केला की, हा अपघात टायर फुटल्यामुळे झाला. हा अपघात वेगवान आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे झाला व त्यानेच स्वतःचे नुकसान केले. त्यामुळे मृताचे कुटुंबीय विमा कंपन्यांकडे भरपाईचा दावा करू शकत नाहीत.’
कुटुंबीयांना दिलासा देण्यास नकार
सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्यायाधीश पीएस नरसिंह आणि आर महादेवन यांच्यासमोर याचिकेवर सुनावणी झाली. खंडपीठाने मृताच्या कुटुंबाला दिलासा दिला नाही. खंडपीठाने म्हटले की, स्वतःच्या चुकीमुळे अपघात होतो तेव्हा मृताचे कुटुंबीय भरपाई मागू शकत नाहीत.