कलम ३७७ गुन्हा मानला नाही तर समलैंगिकतेवरील कलंक नष्ट होईल

47
supreme-court

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कलम ३७७ हा गुन्हा मानला नाही तर समलैंगिकतेवर असलेला सामाजिक कलंक दूर होईल. तसेच या समुदायाबरोबर होणारा भेदभावही संपुष्टात येईल असे मत सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केले. समलैंगिकतेच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारपासून सुनावणी सुरू आहे. त्यावर आज न्यायालयाने हे मत व्यक्त केले. या प्रकरणी पुढील सुनावणी १७ जुलैला होणार आहे.

कलम ३७७ अंतर्गत समलैंगिकांमध्ये शारीरिक संबंध असणे हा गुन्हा आहे आणि त्यासाठी शिक्षेची तरतूदही आहे. त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर सुनावणीदरम्यान जोरदार वाद-प्रतिवाद करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून समाजात समलैंगिकांबाबत भेदभाव करण्यात येतो. त्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. समलिंगी व्यक्तीचे आकर्षण असल्याने समलैंगिकांवर होणारा भेदभाव अयोग्य असल्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाचसदस्यीय पीठाने नमूद केले. याचिकाकर्त्यांच्या वकील मेनका गुरुस्वामी यांना न्यायालयाने विचारले की, कोणता कायदा, नियम, उपनियम किंवा निर्देश आहेत का जे समलैंगिकांना त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवतात? त्यावर असा कोणताही नियम नसल्याचे गुरुस्वामी यांनी स्पष्ट केले.

आपल्या समाजात अनेक गोष्टी आणि पूर्वग्रह आहेत. त्यामुळे समलैंगिकांशी भेदभाव होतो. तसेच त्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण होते. – डी. वाय. चंद्रचूड, न्यायाधीश

आपली प्रतिक्रिया द्या