
अहमदाबादची विमान दुर्घटना व त्यापाठोपाठ विमानांमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर जनहित याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फैलावर घेतले. अहमदाबादच्या एका दुर्घटनेवरुन एअर इंडियाला बदनाम करू नका, असे न्यायालयाने याचिकाकर्त्याला सुनावले. अहमदाबादची दुर्घटना घडल्यापासून प्रत्येकजण एअर इंडियाविरोधात खटला दाखल करु इच्छित आहे. जर प्रश्न सुरक्षा नियमांचा असेल, तर इतर विमान कंपन्यांनाही प्रतिवादी का बनवले नाही? केवळ एअर इंडियाला टार्गेट का केले जातेय, असे सवाल न्यायालयाने केले.
एअर इंडिया विमान दुर्घटनेमुळे विमानांच्या देखभाल आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेची दखल घेताना न्यायमूर्ती सुर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याचिकाकर्त्याला फैलावर घेतले. याचिकेत एअर इंडियावर निष्काळजीपणाचा दावा करण्यात आला होता आणि सुरक्षा नियमांतील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र केवळ एअर इंडियाच्या सुरक्षा नियमांतील कमतरतेकडे बोट दाखवण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करीत खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.
अहमदाबादमधील अपघात अतिशय दुर्दैवी होता. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही एअर इंडियाला बदनाम कराल. जर तुम्हाला नियामक यंत्रणा हवी असेल तर ती फक्त एअर इंडियासाठीच नाही तर सर्व एअरलाइन्ससाठी असावी. अपघातामुळे संपूर्ण एअरलाइनची बदनामी होत आहे. प्रत्येकजण त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करू इच्छितो. इतर एअरलाइन्सविरुद्ध का नाही? असा सवाल करत न्यायालयाने याचिकाकर्त्याला धारेवर धरले. जर तुमची कोणत्याही एअरलाइन किंवा फ्लाइटविरुद्ध वैयक्तिक तक्रार असेल तर ग्राहक मंचात तक्रार करा, असा सल्ला न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिला.