युक्तिवादासाठी 18 ऑक्टोबरनंतर एकही दिवस मिळणार नाही, अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने बजावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सर्व पक्षकारांना युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी कडक शब्दांत बजावले. युक्तिवादासाठी तुम्हाला आणखी किती वेळ हवाय? चालढकल खपवून घेणार नाही हे ध्यानात ठेवा. याआधी दिलेली 18 ऑक्टोबरची डेडलाइन पाळा. त्यापुढे एक दिवसही वाढवून मिळणार नाही असा सज्जड दम न्यायालयाने पक्षकारांना दिला.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठापुढे अयोध्या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू असून गुरुवारी सुनावणीचा 31 वा दिवस होता. हिंदू पक्षकारांनी आपले युक्तिवाद पूर्ण केले असून सध्या मुस्लिम पक्षाचे वकील बाजू मांडत आहेत. अयोध्येतील 2.77 एकर जागेच्या मालकीहक्कावरून दोन्ही पक्षकार परस्परांविरोधात लढत आहेत. या प्रकरणातील जास्तीत जास्त युक्तिवाद 4 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर न्यायालयाला दसऱयाची सुट्टी लागेल. ही सुट्टी संपून न्यायालयाचे कामकाज 14 ऑक्टोबरला पुन्हा सुरू होईल. त्यामुळे 18 ऑक्टोबरपर्यंतचे पाच दिवस पक्षकारांना मिळतील. या मुदतीत युक्तिवाद पूर्ण करा, असे न्यायालयाने पक्षकारांना बजावले.

मुस्लिम पक्षकारांनी मागितली माफी
पुरातत्व खात्याच्या 2003 मधील अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱया मुस्लिम पक्षकारांनी गुरुवारी न्यायालयाची माफी मागितली. पुरातत्व खात्याचा अहवाल तसेच सारांश कोणी लिहिला याबाबत आम्ही शंका उपस्थित करू इच्छित नाही. अहवालाच्या प्रत्येक पानावर सही असली पाहिजे अशीही आमची अपेक्षा नाही. न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असा ‘यू टर्न’ मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी घेतला. ज्येष्ठ वकील मीनाक्षी अरोरा यांनी बुधवारच्या पुरातत्व खात्याच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

…तर तो चमत्कार ठरेल!
सर्व पक्षकारांनी आपले युक्तिवाद 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केले तर अयोध्या प्रकरणाचा निकाल चार आठवडय़ांतच लागेल. हा निकाल कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नसेल असे मत घटनापीठाने नोंदवले. डेडलाइन पाळा, अन्यथा निकाल देणे अशक्य बनेल, असेही घटनापीठाने स्पष्ट केले. सरन्यायाधीश गोगोई हे 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत.