
नगरपालिका निवडणुकीत मालवणमध्ये भाजपकडून पैशाचे वाटप सुरू आहे, असा अरोप शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केला आहे. त्याचा एक व्हिडीओही नितेश राणे यांनी शेअर केला होता. यावरून जर सत्तेमधलेच लोक काळा पैसा पकडून देतात तर मग काळा पैसा कुणाचा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तसेच यांच्या घरात कॅश मिळतेय तरी एक चिटपाखरू त्यांच्या घरी जात नाही, हा कुठला न्याय? असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एक तर एवढी कॅश आली कुठून. पहिली त्याची चौकशी झाली पाहिजे. कारण नोटबंदीचा कायदा याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणला. काळा पैसा आम्ही पूर्णपणे या देशातून हद्दपार करू आणि बाहेर जो काळा पैसा तो देशात आम्ही आणू. हेच ऐकून या देशातल्या लोकांनी या सरकारवर विश्वास ठेवून त्यांना मतदान केलं. चांगली गोष्ट आहे स्वागत आहे जर देशामध्ये चांगल्या गोष्टी होत असतील तर चांगल्या गोष्टींना चांगलं म्हणलंच पाहिजे. पण हे करत असताना ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप लोकांना केले. वॉशिंग मशीन आपण सगळ्यांनी पाहिले. ज्यांच्या ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आरोप केले ते सगळे लोक आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात आहे. हा पहिला मुद्दा त्याच्याच बरोबर एवढी कॅश आली कुठून? म्हणजे हे पहिलं नाही. उदाहरण तुम्हाला आठवत असेल एकनाथ शिंदे साहेबांचे एक वरिष्ठ मंत्री तो व्हिडिओ तर मी तुमच्या चॅनलवर तुमच्या सगळ्या चॅनलनी दाखवला ते त्यांच्या बेडवर बसले होते आणि एवढी मोठी कॅशची बॅग त्यांच्या घरामध्ये होती आणि ते काहीतरी बोलत होते. तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्र नाही देशानी पाहिला. एवढी कॅश येते कुठून? जर नोटबंदी झाली तर एवढ्या नोटा आल्या कुठून याच उत्तर महाराष्ट्र सरकारने भारत सरकारलाही द्यायला लागेल. आणि मला काळजी अशी आहे की हा इशू मी संसदेत एक तारखेला निर्मलाजींच्या निदर्शनात आणून देणार आहे कारण का निर्मलाजींनाही काळजी वाटेल ना की आम्ही इथे नोटबंदी करतोय नोटा कमी होतायत आम्ही म्हणतोय मग एवढा कॅश हा काळाच पैसा असणार ना. जर सत्तेमधलेच लोक काळा पैसा पकडून देतात तर मग काळा पैसा कुणाचा याच उत्तर द्यावं लागेल. महाराष्ट्र सरकारला आणि त्याचबरोबर हे एकामेकांच्या कुरघोड्या काढताना म्हणजे जेव्हा इलेक्शन लागलं नव्हतं तेव्हा हे सगळे एक होते. तेव्हा तो काळा पैसा होता का नव्हता मग तेव्हा का नाही कोणी बोललं मग इलेक्शन मध्येच कस मग हे सरकार नक्की चाललंय कसं आणि हे सरकार कुठल्या विचारांनी चाललेल आहे. आणि एवढा जर काळा पैसा जर फिरत असेल तर माझं म्हणण आहे की माननीय प्रधानमंत्र्यांनी धाडी घालाव्या या सगळ्यांवर घातल्याच पाहिजे ना ज्यांच्या आमच्या अनिल देशमुख साहेबांकडे एक गोष्ट सापडली नाही. 109 वेळा अनिल देशमुख साहेबांवर धाड झाली. एक काय चिंधी पण नाही त्यांच्या घरात सापडली. यांच्या घरात कॅश मिळतोय तरी एक चिटपाखरू त्यांच्या घरी जात नाही हा कुठला न्याय? या देशात लोकशाही राहिली आहे का नाही हाच एक मनात प्रश्न सगळ्यांच्या येतो असेही सुळे म्हणाल्या.
निवडणुकाजवळ आल्यावर सत्ताधारीच एकमेकांवर भ्रष्टाचार, दुबार मतदारयादी, वॉर्ड रचना यावर आरोप करत आहेत, ही परिस्थिती लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे सुळे म्हणाल्या. जर बिनविरोध निवडणूक हा महाराष्ट्रातला नवीन पॅटर्न असेल, तर ही लोकशाहीसाठी घातक गोष्ट आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून या घटनांची चौकशी करण्याची मागणी केली. शेवटी ‘परिवारवाद’च्या आरोपांवर पलटवार करत त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा जास्त परिवारवाद आज भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांत आहे, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.


























































