
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचे मी चॅनेलवर पाहिला आहे. प्रत्यक्षात त्यांचा राजीनामा मी वाचला नाही आणि पाहिलेला नाही, असे सांगत राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांनी राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले.
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला असून, शशिकांत शिंदे हे नवीन प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मला अशा कोणत्याही राजीनाम्याबद्दल माहिती नाही. उद्या पक्षाची बैठक आहे, त्यात याबाबत स्पष्टता येईल. मी जयंत पाटील यांच्याशी दररोज बोलते. ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्यावर मी काय बोलू? सूत्रांकडून देण्यात येणाऱ्या बातम्यांमुळे माध्यमांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न निर्माण होतो, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.