तुम्ही दादांना मुख्यमंत्री करा, आम्ही तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिंदे फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात आलेला वेदांता फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातमध्ये पळवला गेला आहे. त्यावरून राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकल्पाच्या बदल्यात त्या तोडीचा किंवा त्यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिला जाईल असे आश्वासने नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

”मी एकनाथ शिंदे यांना प्रस्ताव देते की त्यांनी दादांना मुख्यमंत्री करावं आम्ही त्यांना केंद्रात मोठं पद देऊ.” असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी उदय सामंत यांच्या प्रतिक्रीयेवरून लगावला आहे. त्यानंतर त्या म्हणाल्या, ” हा राजकारणाचा विषय नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. माझी सर्व नेत्यांना विनंती आहे की सर्व नेत्यांनी एकत्र यावं व केंद्र सरकारला विनंती करावी. ही गुंतवणूक महाराष्ट्राल ऑन मेरिट मिळाली आहे ती ऑन मेरिट राहिली पाहिजे. आम्ही आमच्याकडून प्रयत्न करूच”

वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आज पुण्यात आंदोलन होते. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत होतं. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी ही वक्तव्य़ केली आहेत.