26 लाख महिलांची होणार चौकशी, रक्षाबंधनाच्या दिवशी ‘लाडक्या बहिणीं’ना अजब गिफ्ट; सुप्रिया सुळे यांची महायुती सरकारवर टीका

रक्षाबंधनाच्या दिवशी राज्यभरातील तमाम ‘लाडक्या बहिणीं’ची चौकशी करण्याचा निर्णय जाहीर करुन त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राज्यभरातील तब्बल 26 लाख लाडक्या बहिणींना राखीचे हे अजब गिफ्ट यानिमित्ताने सरकारने दिले, ही खेदाची बाब आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली आहे. क्स वर एक पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, “काही दिवसांपूर्वी आवडत्या असणाऱ्या या बहिणी आता ‘लाडक्या’ राहिल्या नाहीत काय, हा प्रश्न उपस्थित होतो. राज्यभरातील बहिणींची चौकशी करण्यासाठी हे शासन घरोघरी जाणार, प्रत्येक बहिणीची चौकशी करणार, हे अतिशय खेदजनक आहे.”

दरम्यान, अपात्र असतानाही मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतल्याचे उघड होऊ लागल्यानंतर आता सुमारे 26 लाख लाडक्या बहिणींची घरोघर जाऊन चौकशी केली जात आहे. एकाच घरातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, या निकषाची या 26 लाख लाडक्या बहिणींनी पायमल्ली केल्याची महिला व बालकल्याण विभागाची माहिती आहे. त्यामुळे त्यांचा लाभ बंद करण्यापूर्वी चौकशीची भूमिका घेण्यात आली आहे.