
नोटाबंदी आणि काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नोटाबंदीतून किती काळा पैसा परत आला, असा सवाल त्यांनी केला. तसेच बिचारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा खरे निघाले, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत नोटाबंदी आणि काळ्या पैशाबाबत बोलताना लगावला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, काळ्या पैशाबाबत बरेच काही बोलले गेले. निश्चलनीकरण का करण्यात आले? तुम्ही म्हणाले काळा पैसा परत येईल. निश्चलनीकरणामुळे किती काळा पैसा परत आला हे अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगावे. मी आता 15 लाख रुपयांचा हिशेब पण विचारत नाही. बिचारे अमित शहा खरे निघाले. त्यासाठी मला अमित शहा यांचा आदर वाटतो. ते टीव्हीवर खूप चांगले बोलले. ते म्हणाले हा तर जुमला आहे. ते प्रामाणिकपणे बोलले. मला प्रामाणिक माणसे आवडतात, अशी टिप्पणी त्यांनी केली.
…तर मला विजय चौकात फाशी द्या
जर एक पेपर लीक झाला तर मोठी चौकशी केली जाते. त्या अधिकाऱ्याला तुरुंगात टाकले जाते. आता जेव्हा तुमचे दोन कार्यकर्ते छापे कधी मारणार, तुरुंगात कधी टाकणार याची सर्व माहिती आहे. मी हे सिद्ध करू शकते. तुम्हाला कोणीही विचारणार नाही का? आमच्याकडून चूक झाली तर मला फाशी द्या. इथे नाही, मला विजय चौकात फाशी द्या. मात्र ईडी, सीबीआयचा गैरवापर चुकीचा आहे. कदाचित आमच्याकडून पीएमएलची चूक झालीही असेल. म्हणून आम्हाला फाशी देणार का? पारदर्शक काम करा आणि न्याय करा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.




























































