फसवणूक प्रकरणात प्रिन्सची तीन तास चौकशी, सोमवारी हजर राहण्याचे राहुरी पोलिसांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा घातल्याच्या गुह्यातील संशयित आरोपी सैराट फेम प्रिन्स तथा सूरज पवार शुक्रवारी सायंकाळी वकिलांसह राहुरी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तीन तासांच्या चौकशीनंतर सोमवारी पुन्हा चौकशीसाठी येण्याची नोटीस बजावून, रात्री आठ वाजता त्याला सोडून दिले.

महेश बाळकृष्ण वाघडकर (रा. भेंडा फॅक्टरी, ता. नेवासा) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दोन लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. त्यानुसार दत्तात्रय अरुण क्षीरसागर (रा. नाशिक), आकाश विष्णू शिंदे, ओंकार नंदकुमार तरटे (दोघेही रा. संगमनेर), विजय बाळासाहेब साळे (वय 37, रा. खडांबे बु., ता. राहुरी) या आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे.

आरोपींनी वाघडकर यांच्या खोटय़ा नियुक्तीपत्रावर राजमुद्रेचा गोल व आडवा शिक्का मारलेला आढळला. शिक्के तयार करताना आरोपी शिंदे यांच्याबरोबर सूरज पवार होता. असे विनापरवाना शिक्के बनवून देणारा आरोपी तरटे याने चौकशीत सांगितले. त्यामुळे प्रिन्स तथा सूरज पोलिसांच्या रडारवर आला. त्याला पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटीस काढून पोलीस पथके शोध घेत होती.

पवार याच्याबरोबर आलेले ऍड. दीपक शामदीरे (पुणे) म्हणाले, आरोपी शिंदे याने चित्रपटासाठी तयार केलेल्या शिक्क्यांचा गैरवापर केला. नोकरी देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक केली. या गुह्याशी सूरज पवारचा कोणताही संबंध नाही. उलट आरोपी शिंदे याने त्याची अडीच लाखांची फसवणूक केली आहे. त्याचे नाहक नाव घेतल्याने बदनामी झाली. त्यामुळे काही चित्रपटनिर्मात्यांनी त्याला भूमिकेतून वगळले.

तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱहेडा म्हणाले, सूरज पवार याच्या बँकेच्या खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी येत्या सोमवारी (ता. 26) पुन्हा चौकशीसाठी बोलाविले आहे.

पोलिसांना जबाब नोंदवून दिल्यावर सूरज पवार म्हणाला, गुह्यातील आरोपी शिंदे याला ओळखतो. त्याने संगमनेर येथील चित्रपटनिर्माते डॉ. डेरे यांच्या ‘संविधान’ चित्रपटात भूमिका मिळवून दिली. चित्रपट पूर्ण झाल्यावर साडेसहा लाखांचे मानधन ठरले. करारावर सही केल्यावर तीन लाखांचा ऍडव्हान्स मिळाला. त्यापैकी शिंदे याने दोन लाख रुपये घेतले. नंतर आणखी 50 हजार रुपये घेतले. चित्रपटाचे अर्धवट शूटिंग झाले. कोरोनामुळे चित्रपट रखडला. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केलेल्याच्या प्रकरणात माझा काहीही संबंध नसून, मला अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्याने सांगितले.