क्षीरसागरांची दिल्लीत एन्ट्री, गल्लीत खळखळाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी, बीड

पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये तेली समाजाचा राष्ट्रीय स्तरावरील मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी भूषवले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून क्षीरसागरांनी भाजपात जाण्याचा रस्ता सुकर केला. भाजपाच्या गाडीत आताच्या परिस्थितीत अनेक जण बसण्याच्या प्रयत्नात असतांना क्षीरसागरांनी आपला रुमाल टाकून जागा धरली. या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसानंतर काँग्रेसचे माजी आमदार सुरेश नवले यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेत क्षीरसागरांवर कडाडून हल्ला केला.

”क्षीरसागर इकडे जाती तोडा समाज जोडाचा आग्रह मतदारांना करतात, मतदारांना आणि जनतेला आपण जाती पातीच्या फार दूर असल्याचे दाखवतात, त्यांचा हा नाटकी चेहरा समोर आला आहे” असा आरोप नवले यांनी केला आहे. ”जनतेला शहाणपण शिकवणाऱ्या क्षीरसागरांनी आपल्या जातीचा मेळावा स्वार्थासाठी घेतला, दिल्लीत ताकद दाखवण्यासाठी त्यांना जातीचा आधार घ्यावा लागला त्यातही ते अपयशी ठरले आहेत. क्षीरसागर भाजपाच्या वाटेवर असल्याचा आरोप करत क्षीरसागारचा खरा चेहरा समोर आल्याचे नवले म्हणाले आहेत.

त्यांची ही पत्रकार परिषद केवळ फार्स ठरली. मेळावा होऊन पंधरा दिवसाचा कालावधी उलटल्यावर सुरेश नवलेंनी क्षीरसागरांवर जातिवादाचा आरोप केला या मागचे गौडबंगाल काय असू शकते याचीही चर्चा सुरू आहे. कारण सुरेश नवले हे शिवसेनेतून नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेले होते. तेथे आमदारकी मिळवली. मात्र राणेंनी काँग्रेसला सोडल्यावर त्यांनी राणेंसोबत न जाता काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला असला तरी ते काँग्रेसमध्ये फारसे रमले नाहीत. राजकीय निर्णय काय घ्यावा या मनस्थितीत असतांना नवले भाजपातही जाऊ शकतात, असे बोलले जात होते. मात्र त्यांनी कोणता निर्णय घेण्यापूर्वी क्षीरसागरांनी आपली जागा धरून ठेवल्यामुळेच नवले यांना हे आरोप करावे लागले असावेत, अशी चर्चा रंगत आहे.