आश्चर्य…काळबादेवी गावात पांढऱ्या कावळ्याचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्गात विविध घडामोडी घडत असतात. बारकाईने निरीक्षण केल्यास निसर्गातील नवलाई नजरेस पडते. कोकणच्या ग्रामीण भागात सकाळ-सायंकाळ असंख्य प्रकारचे पक्षी येत असतात. त्यांच्या आवाजावरून पक्षी कोणता, हे सहज लक्षात येते. पण काहीवेळा निसर्गात काही चमत्कारांचे दर्शन घडते. रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी गावात असाच एक आगळा चमत्कार पहायला मिळाला. शेखर शेट्ये यांच्या दृष्टीस त्यांच्या घरासमोर चक्क पांढरा कावळा आला आणि त्यांना अशा पांढऱ्याशुभ्र कावळ्याची छबी टिपण्याचा मोह आवरता आला नाही.

कावळा म्हटलं की, त्याचा काळा रंग आणि त्याचं ‘काव काव’ ओरडणं आपल्या डोळ्यांसमोर येतं, कावळा चक्क पांढऱ्या रंगाचाही असतो, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, मात्र एक पांढरा कावळा रत्नागिरीपासून जवळ असलेल्या काळबादेवी गावात शेट्येवाडीत आढळला. शेखर शेट्ये यांनी या पांढऱ्या कावळ्याचे निरीक्षण करून त्याची छायाचित्रेही घेतली.

विशेष म्हणजे गेले चार दिवस शेट्ये यांच्या घराजवळ पांढऱ्या कावळ्याची हजेरी हा गावात चर्चेचा विषय ठरला आहे. शेखर शेट्ये यांच्या घराजवळील परिसरात अनेक पक्षी येतात. ते नेहमीप्रमाणे सकाळी कोंबड्यांना खाणं घालत असताना काही कावळे तिथे आले. त्यात एक पांढरा पक्षी दिसला. दाणे टिपणारा तो पक्षी ‘कबुतर’ असावा असे प्रथम शेट्ये यांना वाटले. थोडे कुतूहलाने त्यांनी त्याचे निरीक्षण केल्यावर तो पांढरा पक्षी कबूतर नसून कावळाच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या पांढऱ्या पक्षाची चोच, डोळा शरीराची ठेवण ही आपल्याला नेहमी दिसणाऱ्या कावळ्यासारखीच होती. थोडा वेळ थांबून त्यांनी आवाज ऐकला. या पांढऱ्या पक्षाने कावळ्याप्रमाणे काव काव केलं. यामुळे शेट्येंना आश्चर्यच वाटले. त्यांनी शेजाऱ्यांनाही याबाबत सांगितले. तेव्हा सर्व जण पांढऱ्या कावळ्याला बघायला जमा झाले. काही जणांनी त्याचे छायाचित्रही काढले. त्यामुळे हा पांढरा कावळा आता चर्चेचा विषय झाला आहे.

निसर्गातील विविध घटकांचे बारकाईने निरीक्षण करण्याची आवड असल्यानेच आमच्या अंगणात दाणे टिपायला आलेल्या पक्षांमध्ये हुबेहूब कावळ्यासारखा दिसणारा आणि ओरडणारा; मुख्यत: रंगाने पांढरा असलेला कावळा दिसला याचे आश्चर्य वाटले. काळा आणि पांढरा दोन्ही रंगांचे कावळे एकत्र वावरताना पाहून सामंजस्याचा संदेश मिळाला, असे निसर्गप्रेमी शेखर शेट्ये सांगतात.

पांढऱ्या कावळ्याची नोंद दुर्मिळ

कावळा पांढऱ्या रंगाचा आढळणे, ही बाब दुर्मिळ असली तरीही असे प्रकार काही ठिकाणी यापूर्वीही आढळले आहेत. रंगद्रव्यातील घटकांच्या अभावामुळे कावळा पांढरा होतो. मेलानीनसारखे घटक एखाद्या कावळ्यात अजिबात नसल्याने त्याचा रंग पांढरा होतो. काळबादेवीमध्ये आढलेला पांढरा कावळा हा अशाच प्रकारचा आहे. असे प्रकार दुर्मिळ असले, तरी नक्कीच नवीन नाहीत. पांढऱ्या रंगाच्या कावळ्याला अन्य कावळे आपल्या समुहात ठेवतात हे लक्षात घेण्यासारखे आहे. पांढऱ्या रंगाचा कावळा दिसून आला ती एक वेगळी प्रजाती नसून रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी आनुवंशिक स्थिती आहे. यामध्ये मेलानीन नावाच्या रंगद्रव्याच्या प्रमाणानुसार याचे दोन प्रकार पडतात. मेलानीनचे प्रमाण कमी असते त्यामुळे पिसांचा रंग पांढरा होतो परंतु चोच डोळे आणि पाय असे उघडे असणारे भाग नेहमीसारखेच असतात, तर ॲलबेनीसम या स्थितीमध्ये मेलानीनची पूर्णपणे कमतरता असल्यामुळे यांचे डोळे लाल तर पाय, चोच फिकट गुलाबी रंगाची दिसते. हा एक आनुवंशिक बदल असून निसर्गतः असे पक्षी खूप दुर्मिळरित्या आढळतात. पक्ष्यांची रंगसंगती ही त्यांना संरक्षण आणि मिलन होण्यासाठी मदत करत असते. अशा पांढऱ्या पक्ष्यांमध्ये ह्या दोन्ही गोष्टी प्रभावित होतात. त्यामुळे पांढऱ्या कावळ्याची नोंद दुर्मिळ आहेच; परंतु पक्ष्यांच्या अभ्यासासाठी आणि आनुवंशिक शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

प्रतीक मोरे, पक्षीमित्र