
ऑस्ट्रेलियामध्ये १२५ वर्षांत प्रथमच, एक महिला देशाच्या लष्कराचे नेतृत्व करणार आहे. संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांनी या नियुक्तीला ऐतिहासिक म्हटले आहे. तसेच त्यांनी लेफ्टनंट जनरल सुसान कोयल यांच्या नावाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियन लष्कराच्या स्थापनेपासूनच्या १२५ वर्षांत प्रथमच एक महिला हे सर्वोच्च पद भूषवणार आहे. लेफ्टनंट जनरल सुसान कोयल यांची लष्करी कारकीर्द जवळपास तीन दशकांची आहे. या काळात, त्यांनी सोलोमन बेटे, अफगाणिस्तान आणि मध्य पूर्व यांसारख्या आव्हानात्मक प्रदेशांमध्ये सेवा बजावली आहे.
कोयल यांनी ऑस्ट्रेलियन संरक्षण दल अकादमीतून विज्ञान शाखेची पदवी घेतली होती. त्यानंतर १९९२ मध्ये ‘रॉयल मिलिटरी कॉलेज’मधून पदवीधर होऊन ‘रॉयल ऑस्ट्रेलियन कॉर्प्स ऑफ सिग्नल्स’मध्ये दाखल झालेल्या कोयल, जनरल सायमन स्टुअर्ट यांच्या निवृत्तीनंतर लष्करप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतील. यासंदर्भात बोलताना, संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांनी म्हटले की, कोयल यांची नियुक्ती हा एक अत्यंत ऐतिहासिक क्षण असून, त्याची विशेष नोंद घेतली जाणे आवश्यक आहे, असे ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ने आपल्या वृत्तात नमूद केले आहे.
ऑस्ट्रेलियन लष्कर महत्त्वपूर्ण बदलांमधून जात असताना सुसान कोयल लष्कराची कमान स्वीकारत आहेत. आधुनिक युद्धाच्या गरजांना प्रतिसाद म्हणून, लष्कर स्वतःला लांब पल्ल्याच्या हल्ल्याची क्षमता, अत्याधुनिक ड्रोन आणि आधुनिक लढाऊ उपकरणांनी सुसज्ज करत आहे. याकरता सुसान यांचा अनुभव फार महत्त्वाचा ठरणार आहे.

























































