
‘महाराष्ट्रात जे सरकार स्थापन झाले त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानायला हवेत. त्यांनी समान किमान कार्यक्रमाचा स्वीकार केला. ते खूप चांगले काम करीत आहेत,’ अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभाराची स्तुती केली आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी एका मुलाखतीदरम्यान महाविकास आघाडी सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असतानाही सातत्य टिकवून आहेत. तिन्ही पक्षांना एकत्र घेऊन चालणे कठीण काम आहे. महाराष्ट्र कशा पद्धतीने जातीय आणि धर्मवादी शक्तीपासून वाचवला पाहिजे याचे हे सुरेख उदाहरण आहे. त्याचा अवलंब ते करत आहेत. तिन्ही पक्ष चांगले काम करत आहेत,’ असे सांगताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कामाबद्दल नाव ठेवायलाही जागा नसल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींच्या खोटय़ा प्रचाराला लोक भुलले
‘2014 नंतर मोदींसारखा आक्रमकपणे प्रचार करणारा मोदींसारखा नेता देशाला मिळाला. लोक त्यांच्या प्रचाराच्या भाषेमुळे, वक्तृत्वामुळे वाहवत गेले. मोदींनी सोलापुरातून सैन्यासाठी कपडे घेतले जातील असे सांगितले होते, मात्र एकही रुपयाचा कपडा घेतला नाही. खोटय़ा प्रचाराला लोक भुलले आणि आता त्यांना कळू लागले आहे,’ असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
तरुणांकडे नेतृत्व देऊन काँग्रेसने चूक केली
सुशीलकुमार शिंदे यांनी मुलाखतीदरम्यान सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. काँग्रेसच्या पराभवाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘तरुणांकडे नेतृत्व द्यायचे, बदल करायला सांगायचे असा प्रयत्न करून पाहिला आणि तिथेच गफलत झाली, असे मला वाटते. मात्र मी पक्षावर अशी थेट टीका करू शकणार नाही. कारण ही प्रक्रिया आहे. आम्ही 10 वर्षांची सत्ता भोगल्याने आम्ही इतके सक्रिय नव्हतो. संघटना बांधणी व्हायला हवी होती ते झाले नाही,’ अशी कबुली सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.





























































